मराठी बातम्या  /  elections  /  Loksabha Elections : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का! रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द, आता कोण असणार उमेदवार?

Loksabha Elections : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का! रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द, आता कोण असणार उमेदवार?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 28, 2024 10:54 PM IST

Rashmi Barve Candidature Cancelled : रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्जच रद्द करण्यात आला आहे. आज सकाळी त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांची उमेदवारीच रद्द करण्यात आली.

रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी उमेदवारी अर्ज बाद
रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी उमेदवारी अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi barve) यांचा उमेदवारी अर्जच रद्द करण्यात आला आहे. रश्मी बर्वें यांचं जात प्रमाणपत्र सकाळी अवैध घोषित केल्यानंतर सायंकाळी त्यांचा उमेदवारी अर्जच रद्द करण्यात आला. रामटेक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला. रश्मी बर्वे यांची जात वैधता प्रमाणपत्र समितीने रद्द केले आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघातून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

गेल्या काही दिवसापासून रामटेक लोकसभा मतदारसंघ (ramtek constituency) चर्चेत राहिला आहे. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी बुधवारी भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार सुनिल केदार यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलं होतां. बर्वे यांनी अर्ज दाखल करताच महायुतीसह अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता.

रश्मी बर्वे (Rashmi barve) यांनी जात वैधता प्रमाणपत्र काढताना बनावट कागदपत्रं जोडल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांनी वकिलामार्फत केली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

महायुती व अपक्ष उमेदवारांच्या आक्षेपानंतर रश्मी बर्वे यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली आणि त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं. त्यानंतर आता सायंकाळच्या सुमारास च्यांची उमेदवारीच रद्द करण्यात आली. जात पडताळणी समितीने बर्वे यांचे चांभार जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांची रामटेकमधून काँग्रेसतर्फे देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

 

रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तरी पर्यायी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र वैध ठरल्याने आता तेच काँग्रेसचे रामटेकमधील अधिकृत उमेदवार असतील.

WhatsApp channel