अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याचा प्रहार करून तिची हत्या केली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात जेऊर पाटोदा शिवारात घडली. हातोड्याचा घाव वर्मी बसल्याने पत्नी जागीच गतप्राण झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पूजा अरुण दाभाडे असे मृत महिलेचे नाव आहे. जेऊर पाटोदा शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मृत पूजा व अरुण हे दाम्पत्य जेऊर पाटोदा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रहात होते. आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्यातरी कारणाने भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात अरुणने पूजाच्या डोक्यात हातोड्याने जोरदार प्रहार केला. यात पूजाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची सूचना परिसरातील नागरिकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दाम्पत्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला व महिलेची हत्या कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप समोर आले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या