Pune Bharti vidyapith crime : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. एका महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आता ६० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका १० वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या प्रकरणी भारती विद्यापीत पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. याची दाखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलाची सुटका केली आहे. मात्र, आरोपी पसार झाले आहे.
भारती विद्यापीठ परिसरामधून एका १० वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी मुलाच्या कुटुंबियांकडे ६० लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने देखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली. दरम्यान, मुलाची सुरक्षितता हा मुख्य उद्देश होता. त्या दृष्टीने तपास करण्यात येत होता. पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत पुणे आणि सातारा पोलिसांच्या दोन पथकांनी आरोपींच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली, मात्र, या कारवाईत आरोपी फरार झाले आहे. सध्या पोलिस त्यांच्या मागावर आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.