Mumbai lok sabha election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे इच्छुक उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करत असतांना काही पक्ष आयात उमेदवारांना संधी देत आहेत. नुकताच बॉलीवूड अभिनेता गोविंदा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून गोविंदाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. दरम्यान,यावरून वाद देखील झाला होता. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. या मतदार संघातून गोविंदा निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांना विदर्भात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे गोविंदा निवडणूक न लढवता केवळ शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभिनेता गोविंदा याने शिवसेनेत प्रवेश केला. त्याच्या पक्ष प्रवेशामुळे मोठा वाढ निर्माण झाला होता. ‘गोविंदाने या पूर्वी निवडणुकीत दाऊदची मदत घेतली होती, या आरोपावर मी आजही ठाम असल्याचे माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक म्हणाले होते.
त्यामुळे गोविंदा याच्या पक्ष प्रवेशावर अनेकांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते. या वादात गोविंदाला मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तिकीट मिळणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र, या सगळ्या वादात गोंवीदा याला उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती पुढे येत असून त्याला केवळ निवडणूक प्रचाराची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे समजते.
विदर्भात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत गोविंदा हा शिवसनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. यात प्रामुख्याने रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदार संघाचा समावेश आहे. ४, ५ व ६ एप्रिल रोजी रामटेक मतदारसंघात तर ११ व १२ एप्रिलला यवतमाळ मतदारसंघात, १५ व १६ एप्रिलला हिंगोली येथे तर १७ व १८ एप्रिलला बुलढाणा मतदारसंघात गोविंदा प्रचार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित बातम्या