प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, गायक आणि दिग्दर्शक अन्नू कपूर अलीकडेच एका मोठ्या घोटाळ्याचे बळी ठरले होते. एका व्यक्तीने त्यांची कोट्यवधींची फसवणूक केली होती. या घटनेनंतर अभिनेत्याने तक्रार दाखल करताच पोलीसही सक्रिय झाले. आता अन्नू कपूर यांच्यासोबत फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गुन्हेगाराने अन्नू कपूरसह तब्बल ६०० लोकांना आपल्या फ्रॉडचे शिकार बनवले होते. ही व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आणि गुंतवणूक सल्लागार असून, त्याचे नाव अंबर दलाल आहे. आता पोलिसांनी अंबर दलालचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.
मुंबई पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेने १३ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर उत्तराखंडमध्ये लपलेल्या अंबर दलालचा शोध लावला आहे. १४ मार्चपासून या व्यक्तीचा शोध सुरू होता. अंबर दलाल याला गुरुवारी रात्री ऋषिकेश येथून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनीही त्यांचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांपासून वाचण्यासाठी हा व्यक्ती वारंवार लोकेशन बदलत होता, असे म्हटले जात आहे. पोलिसांनी पद्क्डू नये म्हणू त्याने मुंबई ते उत्तराखंड असा प्रवास केला. आता त्याने सर्वसामान्यांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच कसे टार्गेट केले, याचा शोध पोलिस घेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबर दलालने ३८० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. यात त्याने तब्बल ६०० लोकांना चुना लावल्याचे समोर येत आहे. मात्र त्याने हे कसे केले, याचा शोध मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा घेत आहेत. अनेक लोक या व्यक्तीकडे सुमारे १५ वर्षांपासून गुंतवणूक करत होते.
भारताशिवाय अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि चीनसारख्या देशांतील लोकही या घोटाळ्यात गुंतवणूक करत होते. या व्यक्तीने अन्नू कपूर यांची बँक केवायसी तपशील अपडेट करण्याच्या बहाण्याने ४.३६ लाख रुपयांची फसवणूक केली. तर, अन्नू कपूर यांनी गुंतवणूक केलेली सगळी रक्कम घेऊन हा व्यक्ती पसार झाल होता. अन्नू कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने जवळपास दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही व्यक्ती बिहारमधील दरभंगा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशी केली असता आणखी अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.
संबंधित बातम्या