Buldhana nandura urban bank scam : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँकेत मोठा अपहार झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे बँकेच्या ठेवदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बँकेच्या कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच तब्बल ५ कोटी ४५ लाख रुपयांचा बँकेला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गजानन शर्मा असे आरोपी संगणक अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांची मदत घेऊन या रक्कमेचा अपहार केल्याचे तपासात पुढे आले आहे. शर्मा याने इतर बँकेच्या विविध खात्यात मोठ्या प्रमाणात बँकेची रक्कम ट्रान्सफर केल्याचे देखील उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँके ही प्रतिष्ठित सहकारी बँक आहे. या बँकेत कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून काम करत असलेला आरोपी गजानन शर्मा याने बँकेत मोठा अपहार केला. बँकेची कोट्यवधी रुपयांची रक्कम शर्मा याने परस्पर दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर केले.
या साठी त्याने बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांची देखील संगनमत केल्याचे तपासात उघड झाले आहे. या द्वारे त्याने ५ कोटी ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, ही घटना बँकेच्या संचालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थेट नांदुरा पोलिस ठाणे गाठत शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी शर्मा याला अटक केली आहे.
या घटनेमुळे ठेवीदारांमध्ये त्यांच्या पैशाबाबत असुरक्षेचे वातावरण आहे. पैसे काढण्यासाठी ठेविदारांची बँकेत झुंबड उडाली आहे. दरम्यान, बँक व्यवस्थापनाने ठेवीदारांना घाबरून जाऊ नये तसेच त्यांच्या ठेवी सुरक्षीत असल्याचे सांगितले आहे.