Breakfast Recipe: प्रथिनेयुक्त पदार्थांचा नाश्तात समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे साहजिकच वारंवार भूक लागत नाही आणि अनहेल्दी खाणे टाळता येते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी विशेषत: प्रथिनांचा आहारात समावेश करावा. आज आम्ही अशीच एक रेसिपी घेऊन आलो आहोत जी अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. तुम्ही अनेक प्रकारचे पराठे खाल्ले असतील. यावेळी जर काही वेगळे करायचे असेल तर अंड्याचा पराठा करून पहा. मुलं ते मोठे सगळ्यांनाच याची चव फार आवडेल. त्याचबरोबर हा पराठा बनवायलाही खूप सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते. ज्यांना अंडी आवडतात त्यांच्यासाठी अंड्याचा पराठा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चविष्ट अंड्याचा पराठा कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
५०० ग्रॅम मैदा
३ अंडी
३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून तेल
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
चवीनुसार मीठ
अंड्याचा पराठा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात मैदा घ्या, त्यात मीठ आणि तेल टाका. हे मिश्रण नीट मिक्स करा आणि मळून घ्या. यानंतर एका वेगळ्या भांड्यात अंडी फोडून त्यात चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा घालून चांगले फेटून घ्या. आता पॅन मध्यम आचेवर ठेवा आणि गरम होऊ द्या. यानंतर पीठाचे गोळे तयार करा. नंतर त्यांना लाटून घ्या. आता चपाती गरम तव्यावर ठेवून त्यावर हलके तेल लावून दोन्ही बाजूंनी चांगले शिजवून घ्या.
यानंतर चपातीच्या कडा एका बाजूने किंचित कापून त्यामध्ये अंड्याचे तयार मिश्रण भरा. नंतर हलके दाबत हलक्या हाताने भाजत रहा. दोन्ही बाजूंनी चांगले शिजल्यानंतर कढईतून बाहेर काढा. तुमचा स्वादिष्ट अंड्याचा पराठा तयार आहे. गरमागरम पराठा सर्वांना आवडेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)