Child Nutrition: मुलांच्या पोषणाबाबत करू नका हलगर्जीपणा, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स-follow these tips about child nutrition never ignore ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Child Nutrition: मुलांच्या पोषणाबाबत करू नका हलगर्जीपणा, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

Child Nutrition: मुलांच्या पोषणाबाबत करू नका हलगर्जीपणा, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

Apr 27, 2024 12:33 AM IST

Health Tips for Child: मुलांना वाढत्या वयात योग्य प्रकारचे पोषण मिळणे खूप आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांच्या पोषणाबाबत या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा.

Child Nutrition: मुलांच्या पोषणाबाबत करू नका हलगर्जीपणा, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स
Child Nutrition: मुलांच्या पोषणाबाबत करू नका हलगर्जीपणा, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स (unsplash)

Healthy Diet Tips for Kids: चुकीच्या आहाराच्या सवयींचा मुलाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते. मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन नियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते. शिवाय निरोगी खाण्याच्या सवयी पुढील आयुष्यात लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि टाइप २ मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना प्रतिबंधित करतात. म्हणूनच मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी लावणे आवश्यक आहे. लुल्लानगर पुणे येथील मदरहुड हॉस्पीटलचे बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

मुलांसाठी निरोगी आहाराच्या टिप्स

१. मुलांनी दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने केली पाहिजे. यात प्रथिनांचा समावेश असायला हवा. कारण ते तुमच्या मुलास दीर्घकाळ पोट भरलेले राहण्यास मदत करू शकते. तसेच किशोरवयीन मुलांना वजन व्यवस्थापनात मदत करू शकते. सकाळचे व्यस्त वेळापत्रक पाहता होल-व्हीट ब्रेड, स्मूदीज, दही, एवोकॅडो किंवा पीनट बटर आणि एग सँडविच सारख्या पर्यायांचा नाश्त्यात समावेश करता येईल.

२. मुलांना घरातील किराणा खरेदी आणि खाद्यपदार्थ निवडण्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. पदार्थांचे पौष्टिक मूल्य समजून घेण्यासाठी लेबल्सचा अर्थ कसा लावायचा याबद्दल शिक्षित करा. त्यांना जेवण तयार करण्यात सामील करा आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. घरच्या बागेत फळे, भाजीपाला आणि औषधी वनस्पती लावणे, त्यांचे संगोपन करणे याविषयी मुलांना प्रशिक्षण द्या.

३. निरोगी आहाराच्या सवयी वाढवण्याचा आणि कौटुंबिक बंध मजबूत करण्याचा मार्ग म्हणून संपुर्ण कुटुंबियांनी एकत्र जेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कुटुंबातील संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळते. तुमच्या मुलांच्या खाण्याच्या सवयींचे निरीक्षण आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि एकत्र बसून जेवण करा. निरोगी खाण्याच्या सवयींचे निरीक्षण करून, तुम्ही तुमच्या मुलाला कॅलरी न ठरवता उत्तम आहाराची निवड करण्यास प्रेरित करू शकता.

४. एकाच वेळी संपुर्ण आहारात बदल न करता मुलाच्या आहारात हळूहळू बदल करा. तुमच्या स्वयंपाकघरातील काही अनहेल्दी पदार्थांना चांगल्या पर्यायांसह बदला. कालांतराने हळूहळू अधिक पौष्टिक पर्यायांचा समावेश करा. यात व्हाईट ब्रेड ऐवजी मल्टीग्रेन ब्रेड, बटाटा चिप्स ऐवजी रताळ्याचे भाजलेले चिप्स, आइस्क्रीम ऐवजी स्मूदी, डेझर्ट किंवा बेकरी पदार्थांच्या जागी घरी तयार केलेले पौष्टीक लाडू तसेच नट्स, गूळ आणि खजूर यांचा वापर करा.

५. पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की मुलाने तळलेले पदार्थ न खाता ग्रिलिंग, भाजलेले आणि वाफेवर शिजवलेले यासारख्या पर्यायांचा वापर करता येतो. तुमच्या मुलांसाठी संतुलित आहाराची निवड करायला विसरु नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)