Tips To Get Rid of Dark Circles: बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली अगदी कमी वयातच तरुण मुले आणि मुलींच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पाहायला मिळतात. ही डार्क सर्कल केवळ डोळ्यांचे सौंदर्यच बिघडवत नाहीत तर संपूर्ण चेहऱ्याच्या सौदर्यात बाधा आणतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक क्रीम, लोशन मिळतात. पण तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून यापासून सहज सुटका मिळवू शकता. मुंबई येथील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी डोळ्याखाली डार्क सर्कल होण्याचे कारण आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी टिप्स सांगितले आहेत.
काळी वर्तुळे ही जगभरातील सर्वात महत्त्वाची कॉस्मेटिक चिंतेची बाब आहे. आनुवंशिकता, धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वैद्यकीय परिस्थितींमुळे ही समस्या दिसून येते. हिमोग्लोबिन कमी होणे, डोळे वारंवार चोळणे, ठराविक औषधे, कोरडी त्वचा, अॅटोपिक डर्माटायटिस (त्वचारोग), इसब यामुळे देखील ही समस्या उद्भवते. त्वचा सैल पडल्यामुळे आणि त्वचेखालील फॅट्सचे प्रमाण कमी झाल्यामुळे काळी वर्तुळे वाढतात. त्वचेला खेचून ठेवणारे फॅट आणि कोलेजनही कमी होऊन संपुष्टात येतात. जेव्हा हे फॅट आणि कोलेजन संपतात, तसे त्वचेच्या खाली असलेल्या नसांचा रंग गडद होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सैल पडलेल्या त्वचेच्या खाली नस बाहेर दिसू लागते आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग गडद दिसू लागतो. जास्त काळ इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करणे, डोळे चोळणे, डोळ्यांचा मेकअप नीट न धुणे यामुळे देखील डार्क सर्कल येऊ शकतात.
काळी वर्तुळे व्यवस्थापित करण्यासाठी आर्गन ऑईलने डोळ्यांखाली मसाज करा. चांगला हायड्रेटिंग फेस मास्क वापरा. पुरेशी झोप घ्या आणि डोळ्यांना सतत चोळणे किंवा स्पर्श करणे टाळा. डोळ्यांखाली मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, कोरडेपणा कमी होतो. कालांतराने काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. सर्व पोषक तत्वांचा समावेश असलेला संतुलित आहाराचे सेवन करावे. काळी वर्तुळे व्यवस्थापित करण्यासाठी दुर्लक्षित केलेली एक टीप म्हणजे तुमच्या आहारात अधिक मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे. मॅग्नेशियम त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि डोळ्यांभोवती सूज कमी करण्यास मदत करते. बदाम, पिस्ता, पालक आणि एवोकॅडो यासारखे पदार्थ मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे त्वचा उजळ, निरोगी दिसण्यासाठी मदत करतात.
केवळ डॉक्टरांनी शिफारस केलेले सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर्स वापरा. या टिप्स व्यतिरिक्त निरोगी त्वचा राखण्यासाठी आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात आणि शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत होते. काळ्या वर्तुळांना लक्ष्य करण्यासाठी तयार केलेल्या स्किन केअर रुटीनचे पालन करा आणि काळ्या वर्तुळासारख्या समस्येला दूर करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या