Sunil Dutt Birthday: ‘साधना’, ‘सुजाता’, ‘मुझे जीने दो’, ‘मदर इंडिया’, ‘वक्त’, ‘पडोसन’, ‘हमराज’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज वाढदिवस आहे. सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज दत्त होते. मात्र, रमेश सहगल यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले. आपल्या दमदार आवाजाने आणि अप्रतिम अभिनयाने सुनील दत्त यांनी अनेक पात्रांमध्ये प्राण फुंकले होते. मात्र, या आधी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेताना त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांनी बस कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ते रेडीओसाठी मुलखाती घेऊ लागले.
रेडिओच्या नोकरीदरम्यान सुनील यांना एकदा नर्गिसची मुलाखत घ्यायची होती. त्यावेळी नर्गिस खूप लोकप्रिय होत्या, तर सुनील दत्त एक सामान्य माणूस होते. मुलाखतीदरम्यान नर्गिस यांना पाहून सुनील दत्त इतके घाबरले की, त्यांच्या तोंडून प्रश्नच निघू शकला नाही. अभिनेत्रीला नंतर त्यांची स्थिती समजली. अभिनेत्रीने त्यांना धीर दिला आणि त्यानंतरच सुनील यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी दोघांनाही माहीत नव्हते की, पुढे जाऊन दोघेही एकमेकांचे जीवनसाथी होणार होते.
सुनील दत्त १९५३मध्ये ‘शिकस्त या चित्रपटासाठी अभिनेता दिलीप कुमार यांची मुलाखत घेण्यासाठी गेले होते. तेव्हा दिग्दर्शक रमेश सहगल सुनील यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि आवाजाने इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्यांच्यापुढच्या चित्रपटासाठी सुनील यांची निवड केली. ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातून सुनील यांना नव्या ओळखीसोबतच एक नवीन नावही मिळाले. दिग्दर्शक रमेश यांनीच बलराज दत्तचे नाव सुनील दत्त असे ठेवले.
‘रेल्वे प्लॅटफॉर्म’मधून इंडस्ट्रीत दाखल झालेल्या सुनील दत्त यांना ‘मदर इंडिया’ हा पुढचा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची नर्गिसशी पुन्हा भेट झाली. या चित्रपटात नर्गिसने त्यांच्या आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. ‘मदर इंडिया’च्या शूटिंगच्या काही काळापूर्वीच नर्गिस आणि राज कपूरचे नाते संपुष्टात आले होते आणि अभिनेत्री या दु:खातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. एके दिवशी ‘मदर इंडिया’च्या सेटवर भीषण आग लागली आणि त्यात नर्गिस अडकल्या होत्या. यावेळी सुनील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अभिनेत्रीचा जीव वाचवला. सुनील यांचे आधीपासून नर्गिसवर प्रेम होते आणि या घटनेनंतर त्यांनी नर्गिसच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच १९५८मध्ये दोघांनी लग्न केले होते.
संबंधित बातम्या