Sunil Dutt Death Anniversary: अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, राजकारणी आणि समाजसेवक सुनील दत्त यांचा आज १८वा स्मृतिदिन आहे. भारत-पाकिस्तान दंगलीतून थोडक्यात बचावलेल्या दत्त साहेबांचा नायक बनण्याचा प्रवास अगदी फिल्मी आहे. रेडिओसाठी दिलीप कुमार यांची मुलाखत घेण्याची वाट पाहत असतानाच त्यांना पहिला चित्रपट मिळाला होता. चित्रपटांव्यतिरिक्त, सुनील दत्त हे राजकारणातही सक्रिय होते. सुनील दत्त यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील नाका खुर्द येथे झाला. बलराज दत्त हे त्यांचे खरे नाव होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले.
वयाच्या १८व्या वर्षी भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्या काळात हिंदूंचा पाठलाग करून त्यांची निर्घृण हत्या केली जात होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांचा मित्र याकुब याने दत्त कुटुंबाला आपल्या घरात आसरा देऊन सर्वांचे प्राण वाचवले होते. फाळणीनंतर सुनील आपल्या कुटुंबासह हरियाणातील यमुना नगरमधील मंडोली गावात स्थायिक झाले. १९४७मध्ये सुनील दत्त यांनी एक वर्ष लष्करात सार्जंट म्हणून काम केले. लखनौमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालयातून पुढचे शिक्षण घेतले. घरखर्च भागवण्यासाठी सुनील दत्त 'बेस्ट' या परिवहन कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम देखील करायचे.
कॉलेजच्या दिवसांत सुनील दत्त यांनी रंगभूमीची आवड निर्माण झाली होती. त्यांचा कणखर आवाज आणि उर्दूवर असलेली गाढ पकड यामुळे त्यांची खूप प्रशंसा होत असे. नाटकादरम्यान सुनीलच्या आवाजाने प्रभावित होऊन रेडिओ प्रोग्रामिंग हेडने त्यांना रेडिओ चॅनलमध्ये नोकरीची ऑफर दिली. सुनील यांनी यासाठी लगेच होकार दिला. नोकरीच्या काळात ते फिल्मी जगतातील स्टार्सच्या मुलाखती घ्यायचे. त्यासाठी त्यांना २५ रुपये मिळायचे. सुनील दत्त यांनी सर्वप्रथम निम्मीची मुलाखत घेतली. दिलीप कुमार, देव आनंद, नर्गिस यांसारखे अनेक बडे स्टार्सही त्यांचे पाहुणे झाले. त्यांची ही नोकरी अनेक महिने सुरू होती. याचसाठी अनेकवेळा सुनील यांना चित्रपटांच्या सेटवरही जावे लागायचे.
एके दिवशी दिलीप कुमार यांची मुलाखत घेण्यासाठी सेटवर पोहोचलेल्या सुनील दत्त यांच्यावर दिग्दर्शक रमेश सहगल यांची नजर पडली. त्यांच्या दिसण्याने आणि आवाजाने प्रभावित झालेल्या रमेश यांनी त्यांना चित्रपटांमध्ये नशीब आजमावायला सांगितले. यावर सुनील दत्त यांनी लगेच होकार दिला. त्यांनी लगेच दिलीप कुमार यांचा पोशाख घालून स्क्रीन टेस्ट दिली. रमेश यांना सुनील दत्त यांचा अभिनय इतका आवडला की, त्यांनी पुढच्या चित्रपटात सुनील दत्त यांना कास्ट केले. दिग्दर्शक रमेश सहगल यांनीच बलराज दत्त यांना सुनील हे नाव दिले होते. खरंतर त्यावेळी बलराज साहनी हे इंडस्ट्रीत आधीच प्रसिद्ध होते. अशा परिस्थितीत गोंधळ टाळण्यासाठी रमेश यांनी बलराजचे नाव बदलून सुनील दत्त असे ठेवले.