Rajinikanth Vettaiyan Shooting: सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सरत्या वर्षात त्यांचा 'जेलर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. लवकरच रजनीकांत त्यांच्या १७०व्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रजनीकांत यांच्या १७०व्या चित्रपटाचे नाव 'वेट्टियान' असे ठेवण्यात आले आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे. या सेट वरून रजनीकांत आणि फहाद फासिल यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
नुकताच रजनीकांत आणि फहाद फासिल यांचा चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'जय भीम' फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल हे करत आहेत. सुपरस्टार रजनीकांत गेल्या काही महिन्यांपासून 'वेट्टियान' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग त्रिवेंद्रम, तिरुनेलवेली आणि तुतिकॉर्नमध्ये सुरू आहे. मात्र, सध्या या चित्रपटाचे शेड्युल तुतिकॉर्नमध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे. रजनीकांत आणि फहाद फासिल यांचा या चित्रपटातील एक सीन चित्रित करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
'जय भीम'च्या यशानंतर, दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल अभिनेते रजनीकांत आणि फहाद फासिल यासारख्या मोठ्या स्टार कास्टसह एक धमाकेदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन, फहाद फासिल, राणा दग्गुबाती, मंजू वारियर, रितिका सिंग आणि दुशारा विजयन दिसणार आहेत. 'लायका प्रोडक्शन' निर्मित 'वेट्टियान' हा रजनीकांत यांचा १७०वा चित्रपट आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर, सिनेमॅटोग्राफर एसआर कथिर आणि संपादक फिलोमिन राज हे देखील या चित्रपटाच्या टीममध्ये सामील झाले आहेत.