8 Don 75 Enjoy Enjoy Song Out: नवीन वर्षाचं स्वागत आणि धमाल डान्स नाही, असं कसं शक्य आहे ना? आता नव्या वर्षाच्या स्वागताला सगळ्यांनाच नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. '८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाचं 'एन्जॉय एन्जॉय' हे धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, या गाण्यात शुभंकर तावडे, प्रियंका जाधव मुख्य भूमिकेत दिसले आहेत. 'एन्जॉय एन्जॉय' हे धमाल गाणं गायक आदर्श शिंदे याने गायलं आहे. '८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी!' हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयाबोवती फिरणारा आहे. या चित्रपटातलं 'एन्जॉय एन्जॉय' हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देणारं आहे. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केेलं आहे. तर, आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत करताना आता सगळेच 'एन्जॉय एन्जॉय' म्हणणार आहेत.
एका महत्त्वाच्या, वेगळ्या व संवेनशील विषयावर भाष्य करणाऱ्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या नव्या वर्षात १९ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.
उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.