Nora Fatehi Deep fake Case: सध्या बॉलिवूडला डीपफेकचं ग्रहण लागलं आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या सेलिब्रेटीचा डीपफेक व्हिडीओ अथवा फोटो समोर येतो. सध्या चित्रपटसृष्टीतून अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओही व्हायरल झाला होता. प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. डीपफेक व्हिडीओ समोर आल्यावर त्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली होती. आता यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही डीपफेकची शिकार झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटो आणि व्हिडीओवर नोरा फतेहीची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिचा हा व्हिडीओ ऑनलाइन शॉपिंग ब्रँडशी संबंधित आहे. या व्हिडीओची सत्यता सांगताना अभिनेत्रीने आपला संताप व्यक्त केला आहे. 'लुलुलेमन' नावाचा एक फॅशन ब्रँड आहे, ज्याला नोरा फतेही व्हिडीओ आणि फोटोमध्ये प्रमोट करताना दिसत आहे. या जाहिरातीमध्ये नोरा फतेहीचा फोटो आहे. तसेच, प्रत्येक वस्तूवर ४० ते ६० टक्के सूट देण्यात येत आहे, असे यात म्हटले आहे. मात्र, आता अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली आहे. नोरा फतेहीने ही पोस्त शेअर करताना ती जाहिरात खोटी असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो शेअर करताना नोरा फतेहीने लिहिले की, ‘हे पाहिल्यानंतर मलाही धक्का बसला आहे. पण ही मी नाही.’ या जाहिरातीमध्ये, नोरा फतेही ज्या ब्रँडचे समर्थन करताना दिसत आहे, त्यात अभिनेत्रीचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. नोरा फतेहीने हे पाहिल्यानंतर लगेचच तिने यावर प्रतिक्रिया दिली आणि चाहत्यांना सांगितले की, या प्रमोशनल जाहिरातीशी तिचा काहीही संबंध नाही.
नोरा फतेही अनेक ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तर ती वर्षभर अनेक ब्रँड्सचे प्रमोशन करताना दिसते. मात्र, या भलत्याच ब्रॅडची जाहिरात पाहिल्यानंतर अभिनेत्रीला चांगलाच धक्का बसला आहे. यापूर्वी रश्मिका मंदाना आणि आलिया भट्ट यांचा डीपफेक व्हिडीओ चर्चेत आला होता. सध्या नोरा फतेही तिच्या आगामी चित्रपट 'क्रॅक'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत विद्युत जामवाल दिसणार आहे. त्यांचा हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. मात्र. या डीपफेक प्रकरणानंतर नोरा फतेहा खूप तणावात आहे.