Sushant Singh Rajput Birthday: इंजिनीअर ते अभिनेता; ‘असा’ होता सुशांत सिंह राजपूत याचा फिल्मी प्रवास!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushant Singh Rajput Birthday: इंजिनीअर ते अभिनेता; ‘असा’ होता सुशांत सिंह राजपूत याचा फिल्मी प्रवास!

Sushant Singh Rajput Birthday: इंजिनीअर ते अभिनेता; ‘असा’ होता सुशांत सिंह राजपूत याचा फिल्मी प्रवास!

Published Jan 21, 2024 07:46 AM IST

Sushant Singh Rajput Birth Anniversary: दमदार अभिनय आणि चित्रपटातील वेगळ्या भूमिकांमुळे सुशांत सिंह राजपूत त्याच्या चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहील.

Sushant Singh Rajput Birth Anniversary
Sushant Singh Rajput Birth Anniversary

Sushant Singh Rajput Birth Anniversary: मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा दमदार अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी पाटणा येथे झाला. सुशांत लहानपणापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होता. शाळेत असताना देखील सुशांत नेहमीच पुस्तकांमध्ये रमून असायचा. सुशांत इतका हुशार होता की, त्याला डीसीई प्रवेश परीक्षेत ७ वा क्रमांक मिळाला होता. यानंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. सुशांतला लहानपणापासूनच अंतराळातील गोष्टींमध्ये खूप रस होता. त्याला अंतराळवीर व्हायचं होतं. पण, त्याच्या कुटुंबाला या अभ्यासाचा खर्च परवडत नव्हता, म्हणून त्याने इंजिनीअरिंग करायला सुरुवात केली. पण, नंतर त्याने इंजिनिअरिंग सोडली आणि फिल्मी दुनियेत करिअर करण्याचा निर्णय घेतला.

इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना सुशांत स्वतःची आवड म्हणून श्यामक दावरच्या डान्स क्लासमध्ये सहभागी झाला होता. श्यामककडून डान्स शिकल्यानंतर तो कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागला. त्याचे नृत्य आणि प्रतिभा पाहून श्यामकने त्याला थिएटरमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सुशांतने बॅरी जॉनच्या अॅक्टिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी त्याने अभिनयाचे धडे गिरवले. इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात प्रवेश केल्यावर त्याला स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून शिष्यवृत्तीची ऑफर मिळाली. त्या क्षणी त्याला ठरवायचे होते की, अभिनय करायचा की इंजिनिअरिंग? दरम्यान त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि इंजिनिअरिंग सोडली.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकथा मोठ्या पडद्यावर झळकणार! अभिनेत्याचा लूक बघाच

सुशांत जेव्हा नादिरा बब्बरच्या थिएटरमध्ये नाटक करत होता, तेव्हा त्याची निवड 'किस देश में है मेरा दिल' या टेलिव्हिजन शोसाठी झाली होती. टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर सुशांतने आपल्या अभिनयाने सगळ्या लोकांना प्रभावित केले. त्यानंतर त्याला 'पवित्र रिश्ता' या मालिकेत काम मिळाले. ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून सुशांत घराघरात प्रसिद्ध झाला. त्याने या शोमध्ये २ वर्षे काम केले. त्याच दरम्यान त्याला 'काई पो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

अभिनेता म्हणून सुशांत सिंह राजपूतची चित्रपट कारकीर्द फार छोटी असली तरी, ती खूपच दमदार होती. त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये काही निवडक सिनेमे केले, ज्यात 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' आणि 'केदारनाथ'सारखे सिनेमे सुपरहिट ठरले. मात्र, हे यश मिळवण्यासाठी अभिनेत्याला खूप संघर्ष करावा लागला. चित्रपटांमधील या पात्रांमुळे सुशांत सिंह राजपूत त्याच्या चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत असेल.

Whats_app_banner