बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही बेधडक बोलण्याबद्दल ओळखली जाते. बॉलिवूडमधील काही मंडळी नेहमीच तिच्या निशाण्यावर असतात. आता पुन्हा एकदा तिनं बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींवर तोफ डागली आहे. 'बॉलिवूडमधील अनेक बडे लोक व्हॉट्सअॅप हॅकिंग, ई-मेल हॅकिंगसारखे बेकायदा उद्योग करतात, असा आरोप तिनं केला आहे. सरकारनं चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी तिनं केली आहे.
हा आरोप करताना कंगनानं कुणाचंही नाव घेतलं नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI) नुकताच एक नियम केला आहे. त्यामुळं आता एखादा फोन कॉल आल्यास त्या व्यक्तीचा नंबरही आपल्या फोन दिसणार आहे. ट्रायच्या या निर्णयाचं कंगनानं स्वागत केलं आहे. तसंच, केंद्र सरकारनं डार्क वेबबाबत काहीतरी करायला हवं, अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली आहे.
'डार्क वेबबद्दलही केंद्र सरकारला काहीतरी करावं लागेल. अनेक लोकप्रिय चित्रपट व्यक्तिरेखा डार्क वेबशी संबंध ठेवून आहेत. ते केवळ तिथल्या कंटेन्टचा आस्वाद घेतात असं नाही तर अनेकांचे व्हॉट्सॲप आणि ई-मेलही हॅक करतात. याचा सखोर तपास केल्यास अनेक मोठी नावं समोर येतील, असं तिनं म्हटलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट नुकताच झळकला होता. या चित्रपटाकडून तिला खूप आशा होत्या, मात्र चित्रपट चालला नाही. आता ती 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही ती करत आहे. चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
रिपोर्ट्सनुसार, कंगना 'कन्नप्पा' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात विष्णू मंचू मुख्य भूमिकेत आहे. प्रभास आणि मोहनलाल या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याचं बोलल जात आहे. या चित्रपटात प्रभास भगवान शिवाची भूमिका साकारणार असून विष्णू त्याच्या भक्ताची भूमिका साकारणार आहे. मोहनलालच्या व्यक्तिरेखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याआधी प्रभास आणि कंगना यांनी ‘एक निरंजन’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.