मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suhana Khan : शाहरुखची मुलगी सुहानानं अलिबागमध्ये खरेदी केला ७८००० चौरस फूटचा भूखंड, किंमत किती पाहा!

Suhana Khan : शाहरुखची मुलगी सुहानानं अलिबागमध्ये खरेदी केला ७८००० चौरस फूटचा भूखंड, किंमत किती पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 24, 2024 04:33 PM IST

Suhana Khan Buys Alibaug Land : बॉलिवूड स्टार शाहरुख खान याची कन्या सुहाना हिनं अलिबागमध्ये मोठी जमीन खरेदी केली आहे.

Suhana Khan buys plot in Alibaug
Suhana Khan buys plot in Alibaug

Suhana Khan buys land in Alibaug : बॉलिवूडचा मेगास्टार शाहरुख खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळं सतत चर्चेत असतो. सध्या तो मुलगी सुहाना खान हिनं केलेल्या एका आर्थिक व्यवहारामुळं चर्चेत आला आहे. शाहरुखची २३ वर्षीय कन्या सुहानानं अलिबागमध्ये तब्बल ७८ हजार चौरस फूटचा भूखंड खरेदी केला आहे.

IndexTap.com नं या संदर्भातील कागदपत्रे शेअर केली आहेत. त्यानुसार सुहानानं दक्षिण मुंबईतील रहिवासी नोझर रुसी वाडिया यांच्यासोबत ०.७२८० हेक्टरच्या जमिनीसाठी करार केला. या भूखंडाचा काही भाग मोकळा आहे तर काही भागावर बांधकाम आहे. हा भूखंड अलिबाग-रेवस रोडवरील मांडवा जेट्टीपासून १३ किमी अंतरावर आहे. या व्यवहारासाठी तिनं ५७ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे.

खान कुटुंबीयांची अलिबागमध्ये मोठी प्रॉपर्टी

१ जून २०२३ रोजी सुहानानं १२.९१ कोटी रुपयांना प्लॉटवरील २,२१८ चौरस फुटावर बांधकाम असलेली १.५ एकर शेतजमीन खरेदी केली. अंजली, रेखा आणि प्रिया खोत या तीन बहिणींकडून ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. या तीन बहिणींना आई-वडिलांकडून वारसाहक्कानं ही जमीन मिळाली होती. शाहरुख खानच्या मालकीचा थलमध्ये एक जलतरण तलाव आणि हेलिपॅड असलेली समुद्राला लागून एक मालमत्ता आहे. बॉलिवूडमधील आपल्या मित्रांसाठी तो इथं पार्टी आयोजित करत असतो.

सुहाना सध्या काय करते?

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्समधून २०२२ मध्ये सुहानानं अभिनयाची पदवी घेतली आहे. तिचा एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. वडिलांप्रमाणे तीही सिनेमात कारकीर्द करेल असं बोललं जातं.

अलिबाग हे सेलिब्रिटींचं आवडतं ठिकाण

अलिबागच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेली गावं ही अनेक सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट जगतातील लोकांसाठी सुट्टी घालवण्याची आवडती ठिकाणं आहेत. मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये अनुष्का शर्मा-विराट कोहली यांनी आवास लिव्हिंगमध्ये २००० चौरस फुटाचा आलिशान व्हिला ६ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये विराटनं जिराड गावात ३,३५० चौरस मीटर (३६,०५९ चौरस फूट) फार्महाऊस १९.२४ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. २०२१ मध्ये रोहित शर्मानंही याच भागातील म्हात्रोली गावात चार एकर जमीन खरेदी केली होती.

रो-रो आणि स्पीड बोटीमुळं मुंबई आणि अलिबाग प्रवास खूपच सोपा झाला आहे. शिवडी ते न्हावा शेवा यांना जोडणाऱ्या २२ किमीच्या सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वर्षी जानेवारीत उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळं देखील अलिबागची कनेक्टिविटी वाढली आहे.

IPL_Entry_Point