गेले काही दिवसांपासून अचानक गायब झाल्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम ‘रोशन सिंह सोढी’ अर्थात अभिनेता गुरुचरण सिंह चर्चेत आला आहे. त्याच्या गायब होण्यामुळे आता सगळेच लोक हैराण झाले आहेत. अभिनेता गुरुचरण सिंहने ज्याप्रकारे स्वतःला ‘रोशनसिंह सोढी’च्या व्यक्तिरेखेमध्ये साचेबद्ध केले, ते आश्चर्यकारक होते. गुरुचरण सिंह या शोशी वर्षानुवर्षे जोडला गेला होता. त्याने आपल्या पंजाबी व्यक्तिरेखेने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याचे शेवटचे लोकेशन दिल्लीच्या पालममध्ये आढळले होते. तेव्हापासून तो कुणालाच दिसलेला नाही. या दरम्यान त्याला आर्थिक चणचण होती, असे देखील म्हटले जाते.
गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्याने लोकांना धक्का बसला आहे. अभिनेत्याचे कुटुंबीय त्याच्या शोधासाठी सतत प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी याला नकार दिला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेसाठी अभिनेता गुरुचरण सिंहला मोठी रक्कम मिळत होती.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शो आहे. या दमदार कॉमेडी शोने १५ वर्षे चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेत ‘सोढी’ची भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंहला प्रति एपिसोड ६५ ते ८० रुपये मिळायचे. अनेक वर्ष गुरुचरण सिंह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करत होता. मात्र, कोरोनाच्या दरम्यान वडील आजारी पडल्याने त्याने या मालिकेला रामराम ठोकला होता. वडिलांची काळजी घेण्यासाठी अभिनेत्याने करिअरमधून ब्रेक घेतला होता.
२०२०मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडल्यानंतर गुरचरण सिंह याला त्याचे पैसे मिळाले नव्हते, असे म्हटले जात होते. याबद्दल निर्माते असित कुमार मोदींना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, 'असे काही नव्हते. तो काळ कोरोनाचा होता, आणि तो आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय तणावपूर्ण होता. त्या काळात शूटिंगही थांबलं होतं. शो सुरू राहील की, नाही याची देखील शाश्वती नव्हती. आपल्या आजूबाजूचे जग बदलत होते. सर्वांसाठी हा कठीण काळ होता. मात्र, आम्ही सगळ्यांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला होता.’