नुकतीच टी२० विश्वचषक २०२४साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १ जूनपासून टी-२० विश्वचषक सामन्यांना सुरुवात होणार आहे. विश्वचषकापूर्वी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी या खेळात टीम इंडियाचा भाग असलेल्या या १५ खेळाडूंना खास संदेश दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटातील अश्वत्थामाच्या भूमिकेतून भारतीय खेळाडूंना खास संदेश दिला आहे.
अमिताभ बच्चन यांचा खास संदेश असलेला हा व्हिडीओ नागा अश्विनच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन म्हणत आहेत की, 'हे एक महान युद्ध आहे, आता तयार व्हा. आता तुम्ही शूर व्हा, तुमचे नशीब बदला आणि तुमची ताकद दाखवा, तुमची ताकद अनुभवा.’ अभिनेते अमिताभ बच्चन ही कविता वाचत असताना व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर 'कल्की २८९८एडी'चे संगीत वाजत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्यासोबत महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंह देखील दिसत आहेत.
अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास यांचा 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन, दिशा पाटणी असे अनेक कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. दीपिका आणि प्रभास एकत्र स्क्रिन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
टी२० वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर भारत ५ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करेल. रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज हे टी२० विश्वचषक संघाचा भाग असणार आहेत. तर, शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांना राखीव ठेवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या