Happy Birthday Irrfan Khan: आपल्या दमदार अभिनयाने केवळ बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूड देखील गाजवणारा अभिनेता इरफान खान याचा आज (७ जानेवारी) वाढदिवस आहे. आज अभिनेता या जगात नसला तरी त्याच्या आठवणी मात्र चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. इरफान खान याला या जगातून जाऊन आता तीन वर्ष झाली असली, तरी त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून तो अजरामर ठरला आहे.दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा जन्म ७ जानेवारी १९६७ रोजी झाला होता. इरफान खानचे नाव अशा निवडक अभिनेत्यांमध्ये सामील आहे, ज्याने कुणाच्याही मदतीशिवाय मनोरंजन विश्वात आपले हक्काचे स्थान निर्माण केले होते. चला तर जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी...
- केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर, हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या इरफान खानला अभिनेता नव्हे तर, क्रिकेटर व्हायचं होतं. इरफान खानच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. मात्र, इरफान खान यांनी त्यात उतरण्यास नकार दिलेला.
- इरफान खानने सिनेजगतात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण, त्याचे खरे नाव तुम्हाला माहीत आहे का?इरफान खानचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते.
- केवळ ऑनस्क्रीनच नाही तर, ऑफस्क्रीनही आपल्या आकर्षक स्टाईलने सर्वांची मने जिंकणारा इरफान खान जयपूरच्या टोंकचा रहिवासी होता.
- इरफान खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. इरफानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी ‘सलाम बॉम्बे’शिवाय अपूर्ण आहे. इरफान खानला हा चित्रपट मिळाला, तेव्हा तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.
- इरफान खानचा चित्रपट ‘लंच बॉक्स’ हाTFCA (टोरंटो फिल्म क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार) प्राप्त करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार,इरफान खानने प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट ‘इंटरस्टेलर’ला नकार दिला होता.कारण, त्यावेळी तो ‘द लंच बॉक्स’ आणि ‘द डे’चे शूटिंग करत होता. त्याला हे दोन चित्रपट सोडून ४ महिने परदेशात राहायचे नव्हते.
- इरफान खानने मुंबईत येऊन एअर कंडिशनर दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या दरम्यान तो पहिल्यांदाच दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घरी गेला होता. त्यावेळी राजेश खन्ना यांच्या घरातील एसी त्याने दुरुस्त केला होता.
- फार कमी लोकांना माहित असेल की, अभिनेता इरफान खानने मीरा नायरच्या ‘कोशेर व्हेजिटेरियन’ चित्रपटात हॉलिवूड अभिनेत्री नताली पोर्टमनसोबत काम केले आहे.
- कदाचित मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनी याकडे कधी लक्ष दिले नसेल,पण इरफान खानची गणना उंच अभिनेत्यांमध्ये केली जात होती. इरफानची उंची ६ फुटांपेक्षा जास्त होती.
- ऑस्कर पुरस्कारादरम्यान,हॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स स्वतः पुढे आली आणि तिने इरफान खानचे त्याच्या'द नेमकेस'चित्रपटासाठी कौतुक केले होते.