बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन लोढा यांच्या मुंबईजवळील अलिबाग येथील प्रोजेक्टमध्ये तब्बल १० हजार चौरस फुटांची जमीन १० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झालेल्या अलिबागमधील ‘ए अलिबाग’ या २० एकर भूखंडाच्या प्रकल्पात हा भूखंड खरेदी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याबाबत अभिनंदन लोढा यांच्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या 'द सरयू' या प्रकल्पात याच बिल्डरकडून जमीन खरेदी केली होती. रिअल इस्टेट उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन ज्या भूखंडावर आलिशान घर बांधणार आहेत, त्याचे क्षेत्रफळ सुमारे १०,००० चौरस फूट असून त्याची किंमत १४.५ कोटी रुपये आहे. अलिबाग अलीकडच्या काळात लक्झरी रिट्रीट आणि गुंतवणुकीच्या संधी शोधत असलेल्या आणि उच्च नेटवर्थ असलेल्या व्यक्तींच्या पसंतीचे रिअल इस्टेट डेस्टिनेशन बनले आहे. मुंबईपासून जवळ, सुविकसित पायाभूत सुविधा आणि किनारपट्टीचा परिसर यामुळे अलिकडच्या काळात अलिबागमधील प्रीमियम मालमत्तांच्या मागणीत वाढ झाली आहे.
अमिताभ बच्चन यांची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याला अधिक पसंती आहे. २०२३मध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी जुहू येथील पाच घरांपैकी पहिला असलेला प्रतीक्षा बंगला त्यांची मुलगी श्वेता नंदा हिला भेट म्हणून दिला होता. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘शोले’च्या यशानंतर लगेचच या जोडप्याने जुहूमध्ये पहिला बंगला अर्थात प्रतीक्षा खरेदी केला होता.
जुहूमध्ये अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या इतर अनेक मालमत्ता आहेत. यामध्ये ‘जनक’ नावाचा एक बंगला आहे, जो ऑफिस म्हणून अधिक वापरला जातो. तर, ‘वत्स’ आणि ‘अम्मू’ हे आणखी दोन बंगले आहेत, ज्याचा काही भाग सिटी बँकेला भाड्याने देण्यात आला होता आणि २०२१मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आला. २०२१मध्ये बच्चन यांनी नवी दिल्लीतील गुलमोहर पार्कमधील सोपान बंगला नेझोन समूहाच्या सीईओ अवनी बदर यांना २३ कोटी रुपयांना विकला होता. २१०० चौरस फुटांचा हा बंगला तेजी बच्चन यांच्या नावावर नोंदणीकृत होता. ‘प्रतीक्षा' घेण्यापूर्वी त्यांचे आई-वडील याच घरात राहत होते.
अलिबाग हे मुंबईपासून अगदीच जवळचे ठिकाण आहे. रो-रो आणि स्पीड बोटने मुंबईला अलिबागशी जोडल्यानंतर आता अलिबागची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. शिवडी ते न्हावा शेवा यांना जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूमुळे अलिबागला जाणारा रस्ता ही आणखी सुधारला आहे. यामुळे अलिबागमध्ये येत्या काळात अंदाजे ३००० कोटी रुपयांची गुंतवणुक अपेक्षित आहे. तर, इंटिग्रेटेड टाऊनशिप आणि लक्झरी व्हिला बांधण्यासाठी अंदाजे २५० एकर जमीन टप्प्याटप्प्याने विकसित केली जाण्याची शक्यता आहे.