मराठी बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या आठवड्यात तिकीट बारीवर एकाच दिवशी ३ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकान कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. एकाच दिवशी हे तीन चित्रपट रिलीज होत असल्याने, आपण नेमका कोणता चित्रपट बघायचा हे ठरवण्यात चांगलेच गोंधळून गेले आहेत. आता तुम्ही देखील अशाच गोंधळात असला, तर या आठवड्यात कोणते चित्रपट रिलीज होतायत, याची यादी जाणून घेऊया.. ही यादी बघून तुम्ही नक्कीच ठरवू शकाल की, सगळ्यात आधी कोणता चित्रपट बघायचा...
समाजात फार पूर्वीपासून काही प्रथा आणि परंपरा चालत आल्या आहेत. पुढच्या पिढ्या देखील अगदी डोळ्यांवर पट्टी बांधून या प्रथा आणि परंपरा पाळत असतात. अशा कितीतरी प्रथा काळानुसार कलाबाह्य ठरल्या असल्या तरी, देखील केवळ आपल्या पूर्वजांनी सांगितल्या म्हणून आपण त्या पाळत राहतो. असाच एक विषय ‘परंपरा’ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे कुटुंब, त्याचं जगणं आणि समाजाचा ताण अशा वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलेलं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्या मुख्य भूमिका असून, प्रकाश धोत्रे, अरुण कदम, किशोर रावराणे, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, नम्रता पावसकर, भूषण घाडी, जयराज नायर आणि जनार्दन परब यांच्या दमदार भूमिका दिसणार आहेत.
आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपत असतो. सुख दुःखाच्या प्रसंगात हीच नाती आपल्याला साथ देतात. अशाच नात्यांचं महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया सांगणारा ‘लेक असावी तर अशी’ हा या आठवड्यात आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय कोंडके दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले यांच्यासोबत यतीन कार्येकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमगर, ओंकार भोजने, कमलेश सावंत आणि सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासोबतच या चित्रपटातून गार्गी दातार ही नवी अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
नावाप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील समस्यांवर भाष्य करणारा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट देखील या आठवड्यात म्हणजेच २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर आणि भूषण प्रधान हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मुलांसाठी असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडू की, काय याची चिंता आई-वडिलांना सतत लागून राहिलेली असते. परंतु, अशी चिंता, काळजी आणि हीच जबाबदारी आई-वडिलांच्या म्हातारपणात मुलांना असते का? हा प्रश्न या चित्रपटातून मांडला गेला आहे. वृद्धावस्थेत मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची सगळ्याच आई-वडिलांची इच्छा असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर म्हाताऱ्या आई-वडिलांनी ही अपेक्षा कोणाकडून ठेवायची? असा प्रश्न या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटात एक बाबा आपल्याच मुलाला कोर्टात खेचताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या