Amitabh Bachchan Hospitalization Rumor: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. तर, यावेळी अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली गेली असल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र, आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपण रुग्णालयात दाखल झाल्याच्या किंवा आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या फेक असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी आपण आजारी असल्याचे वृत्त देखील फेटाळून लावले आहे. एकीकडे अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखवल असल्याची चर्चा सुरू होती. तर, दुसरीकडे अमिताभ बच्चन हे अभिषेकसोबत क्रिकेटचा सामना पाहत होते.
‘बिग बी’ अर्थात अमिताभ यांनी मुलगा अभिषेक बच्चन याच्या क्रिकेटचा सामना पाहण्याचा आनंद घेतला. क्रिकेटचा सामना संपल्यानंतर घरी परतत असताना, माध्यमांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांना आता बरे वाटत आहे का? ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते का? ते विचारले. मात्र, तेव्हा स्वतः अमिताभ बच्चन यांनी या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, एका जवळच्या सूत्राने ‘झूम’ला या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘अमिताभ बच्चन हे अगदी ठणठणीत बरे आहेत. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे किंवा ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी ही केवळ अफवा आहे. या कारणामुळेच अमिताभ बच्चन स्वतःच्या आरोग्य विषयी कोणतीही अपडेट सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून शेअर करत नाही. कारण अमिताभ बच्चन यांनी काहीही सांगताच लगेच त्यांच्या बातम्या व्हायरल होतात. अमिताभ बच्चन हे केवळ त्यांच्या काही रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते.’ आता अवघ्या काही तासांच्या असलेल्या टेस्ट करून अमिताभ बच्चन अगदी ठणठणीत घरी परतले आणि त्यांनी संध्याकाळी आपल्या मुलासोबत क्रिकेटचा सामना पाहण्याचा आनंद देखील लुटला. त्यामुळे आता अमिताभ बच्चन आजारी असल्याचा किंवा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.
अमिताभ बच्चन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये बिग बी मुंबईत पार पडलेल्या 'ISPL T10' मॅचचा आनंद घेताना दिसले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन आणि ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरही दिसले. मॅचपाहून बाहेर पडल्यानंतर बिग बींना तिथे उपस्थित पापाराझींनी घेरले. यावेळी लोकांनी बिग बींना त्यांच्या तब्येतीविषयी विचारले, तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘फेक न्यूज’. अमिताभ बच्चन यांचे हे उत्तर ऐकून आता त्यांच्या चाहत्यांचा जीव देखील भांड्यात पडला आहे.