मराठा आरक्षणाचं वादळ अवघ्या महाराष्ट्रात पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आता प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे. ‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता अवघे चार दिवस बाकी असताना, सेन्सर बोर्डाने मोठा निर्णय घेत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोक लावली आहे. याचाच अर्थ हा चित्रपट आता २६ एप्रिल रोजी रिलीज होणार नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं घरदार पणाला लावलं होतं. याच मनोज जरांगे पाटील यांचा हा जीवन प्रवास ‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
गेल्या चार पाच महिन्यांपासून हा चित्रपट जोरदार चर्चेत होता. मात्र, आता हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी रिलीज होणार नसून, चित्रपट सेंसोर बोर्डाने प्रदर्शनासाठी काही काळ थांबवला असल्याचं लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे. सध्या देशभरात चाललेला निवडणुकीचा धुराळा, आचारसंहिता, मतदान या गोष्टींमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहितेच्या काळात प्रदर्शित करता येणार नसल्याचं सेन्सर बोर्डाने सांगितले आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांना आणखी काही दिवस थांबावं लागणार आहे. या चित्रपटाच्या टीमने अगदी रात्रंदिवस कष्ट करून हा चित्रपट बनवला आहे. मात्र, आता प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला याचा दुःख होतंय, असं कलाकार म्हणत आहेत.
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारा अभिनेता रोहन पाटील याने याबद्दल बोलताना म्हटले की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीत सुपरहिट चित्रपट होणारच आहे. दुसरीकडे, हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना थांबवल्यामुळे राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे. आता ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट २१ जून २०२४ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होणार आहे, याची ग्वाही दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी दिली आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनावर टाच येताच चित्रपटाचे लेखक-निर्माते गोवर्धन दोलताडे, दिग्दर्शक शिवाजी दौलताडे, कलाकार मंडळी आणि संपूर्ण टीमने मनोरं जरांगे पाटील यांची भेट घेऊन, त्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या. ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याचे कळतात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘हा चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने आता थांबवला असला तरी, २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगतो की, या नव्या तारखेला सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट नक्कीच बघेल. या चित्रपटाला माझ्या खूप शुभेच्छा आहेतच आणि हा चित्रपट जाणून-बुजून कोणी अडवण्याचा प्रयत्न करत असाल, तर गाठ माझ्याशी आहे.’ या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी मनोज जारंगे पाटील लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असून, ८ जून रोजी होणाऱ्या एका सभेत देखील ते ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. याची ग्वाही खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या