Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अनेक चांगले बदल पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात आणि संसारात कशा प्रकारे महत्त्व आणि सन्मान मिळाला पाहिजे याच उत्तम उदाहरण आशुतोष आणि अरुंधतीचचा संसार. सप्तपदी घेण्याआधीपासून ते सप्तपदी घेतल्यानंतर प्रत्येक पावलावर आशुतोष अरुंधतीची साथ देताना दिसत आहे. लग्न झाल्यापासूनच आशुतोषने आपल्या संसाराच्या रथाचं सारथ्य अरुंधतीवर सोपवलं होतं. आता तो तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी देखील मदत करणार आहे.
अरुंधतीला कोणत्याच बाबतीत कुणावरही अवलंबून राहायला लागू नये, याची काळजी स्वतः आशुतोष घेत आहे. आधी गाण्याची सुरुवात करण्यासाठी त्याने अरुंधतीला प्रोत्साहन दिलं, आता तो तिला गाडी देखील चालवायला शिकवणार आहे. या आधी अरुंधतीने अनघाकडून गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले घेतले होते. याचाच उपयोग तिला आता होणार आहे. अरुंधतीने गाडी चालवावी यासाठी आशुतोष आता स्वतःच्या गाडीच्या स्टिअरिंग तिच्या हातात देणार आहे. आजपासून ही गाडी तूच चालवणार, असं त्याने तिला सांगितलं आहे.
या निमित्ताने अरुंधतीच्या संसारातील नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. अरुंधती आता स्वतः गाडी चालवून आशुतोषला ऑफिसला घेऊन जाणार आहे. यामुळे तिच्यात देखील आता एक नवा आत्मविश्वास संचारणार आहे. एकीकडे अरुंधती तिच्या आयुष्यात दोन पावलं पुढे गेली. मात्र, अनिरुद्ध अजूनही त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकलेला नाही. अरुंधती घरातून गेली असली, तरी अनिरुद्ध तिच्या विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाहीये. यामुळे त्याच्या आयुष्यात वाद निर्माण होत आहेत.
एकीकडे अनिरुद्ध आणि संजना यांच्यात वाद होत आहेत. तर, दुसरीकडे आता अनिरुद्ध त्याच्या मुलांपासून देखील दुरावू लागला आहे. देशमुखांच्या घरात सध्या मेडिकल चेकअपविषयी चर्चा सुरू आहे. यावेळी अभिषेक आईला म्हणजेच अरुंधतीला चेकअपला यायचे आहे, असे बोलतो. मात्र, यावेळी अनिरुद्ध भडकतो. अरुंधतीला आता आपली गरज नाही. तिची काळजी घेण्यासाठी आशुतोष आहे, असे अनिरुद्ध म्हणतो. यावरून आता देशमुखांच्या घरात नवा वाद निर्माण होणार आहे.
संबंधित बातम्या