Congress leader Atul londhe on Nitin Gadkari : चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. गडकरी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी समाचार घेत त्यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसने चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एक जागा निवडून आली होती. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. ज्यांनी महाराष्ट्रात विजय मिळवला. दरम्यान, बाळू धानोरकर यांचे मे २०२३ मध्ये निधन झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचार सभेत बोलतांना नितीन गडकरी यांनी वरील विधान केले होते.
चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा इथे जाहीर सभा झाली होती. या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत गडकरी म्हणाले, मी जे बोलतो ते करुन दाखवतो. सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान खासदाराला संसदेत पाठवा. त्यांच्या मागे मोदीजींची ताकद, माझी ताकद आणि ट्रीपल इंजिन असेल. अस पॉवरफुल शिलाजीत देऊ की बास विकासाचं काम एकदम जोरात होईल.
गडकरी यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे म्हणाले, चंद्रपूर येथे आमची भगिनी निवडणूक लढवत आहे. बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवत आहेत. केवळ ३७ वर्षांची ही पोरगी दोन मुले असतांना पतीच्या अकाली निधनाने निवडणूक लढवत आहे. पण, नितीन गडकरी यांनी केलेले व्यक्तव्य हे राजकारनाला लाज आणणारे आहे. तुम्ही कसा उमेदवार निवडणूक दिला असे देखील लोंढे यांनी म्हणत नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे.