Loksabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह वाटप केलेल्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर तर महादेव जानकर (Mahadev jankar( यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. (Prakash Ambedkar and Mahadev jankar get new election symbols)
याबरोबरच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून अमरावती मतदारसंघातून नवनीत राणांसमोर आव्हान उभ्या केलेल्या दिनेश बूब यांनाही शिट्टी हे निवडणूक चिन्ह दिले आहे.
यावेळी लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडून दोन नवे गट निर्माण झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांना निवडणूक आयोगाने मान्यता देतानाच त्यांना अनुक्रमे मशाल व तुतारी हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मात्र अन्य छोट्या पक्षांनातसेच अपक्षांना निवडणुकीसाठी पक्षचिन्ह आयोगाकडून देण्यात येतं. उमेदवाराकडून नामांकन भरल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप केले जाते. त्यानुसार आज निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्ण करत छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीच्याचिन्हांचं वाटप केलं आहे.
महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यांच्यासमोर भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. त्याचबरोबर काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना समर्थन देऊन अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने अकोल्यात आपला उमेदवार दिला आहे. काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अकोल्याची निवडणूक तिरंगी बनली आहे.
दुसरीकडे शरद पवारांनी माढा मतदारसंघात उमेदवारी देण्याची घोषणा केल्यानंतरही महादेव जानकरांना महायुतीत सामील करून घेण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. त्यांना महायुतीकडून परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय जाधव यांना मैदानात उतरवले आहे. मागच्या वेळी धनुष्यबाणावर निवडून आलेलेजाधव यांनायावेळी मशाल चिन्हासह लढावे लागत आहे. त्यांच्या विरोधात महादेव जानकर शिट्टी घेऊन येणार आहेत. येथे शिवसेना ठाकरे व महायुतीमध्येच लढत होणार आहे.
संबंधित बातम्या