केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची व योजनेचे लाभ लोकांना सांगण्याची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्री व खासदारांवर सोपवली आहे. लोकसभेच्या प्रचारकार्यात हे मंत्री व नेते सरकारच्या योजना लोकांना सांगून मते मागताना दिसत आहेत. त्यातच राज्यातीलराज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित(Vijay Kumar Gavit)यांनी अजब विधानकरून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शिरपूर येथील नमो संवाद (Namo Samvad) मेळाव्या दरम्यान मंत्री विजयकुमार गावित यांनी भाषणादरम्यान हे अजब विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरू केलेल्या विकास योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात आम्ही कमी पडलो. नाहीतर ही वेळच आली नसती, असे वक्तव्य भाजपचे नेते व राज्यातील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केले आहे. मोदींनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो, अशी जाहीर कबुली विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
शिरपूरमध्ये नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ नमो संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री विजयकुमार गावित यांनी अजब वक्तव्य करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यात बोलताना विजयकुमार गावित म्हणाले की, मोदींनी सुरू केलेल्या योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू शकलो असतो, तर खूप मोठे काम झाले असते. या योजना पोहोचल्या असत्या तर अशा बैठका घेत लाभार्थ्यांकडे जा, हे करा ते करा असे करण्याची वेळच आली नसती, अशी कबुली गावितांनी दिली आहे.
मंत्री गावित म्हणाले की,मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत. सामान्य माणसाची गरज भागली पाहिजे, तो स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, गरीबाने स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजे,अशा योजना मोदींनी सुरू केल्या. एकही समाज घटक यापासून अलिप्त राहिला नाही.
सरकारने महिलांसाठी, वृद्धांसाठी, बारा बलुतेदारांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी योजना सुरू केल्या. मात्र उणीव इतकीच राहिली की, या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात आम्ही कमी पडलो.
मंत्री गावित यांच्या वक्तव्यामुळे विविध केंद्रीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का? असा प्रश्न उपस्थितहोतआहे.