देशासह राज्यात दुष्काळ, पिकांना हमीभाव, तरुणांमधील बेरोजगारी, महागाई, पायाभूत सुविधा यासारखे कळीचे मुद्दे आहेत. निवडणुकीच्या काळात हे मुद्दे खूप प्रभावी ठरतात. अनेक पक्षांचा व उमेदवारांचा भर असतो की, प्रचार या मुद्यांभोवतीच केंद्रीत राहील. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने या सर्व प्रश्नांना फाटा देत एक अफलातून घोषणा केली आहे. लग्न न झालेल्या तरूणांची लग्न करणं हा माझ्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी मी काम करणार असल्याचे या उमेदवाराने म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारस्कर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारस्कर आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाध साधताना तरूणांच्या लग्नाच्या समस्येवर भाष्य केलं.
रमेश बारस्कर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यातील तरुणांच्या लग्नाची फार गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बेरोजगारीमुळे तरुणांची वेळेवर लग्नं होत नाहीत. अनेकांनी वयाची पस्तीशी-चाळीशी ओलांडली तरी त्यांची लग्ने जुळत नाहीत. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडविण्यासाठी मी प्राधान्याने काम करणार आहे.
याबरोबरचमाढा मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत, शेतीमालाला भाव मिळत नाही, महिलांचे प्रश्न आहेत, यावरही काम करायचे आहे.
बारस्कर यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लग्नाळू तरूणांचा मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी हा मुद्दा थेट निवडणूक प्रचारात आणला आहे. याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
बारस्कर यांनी महाविकास आघाडीकडे माढ्यातून उमेदवारी मागितली होती. त्यानंतर काल (रविवार) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचून रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितची उमेदवारी जाहीर होताच रमेश बारस्कर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.