लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान होणार आहे. यात मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार मोठ-मोठी आश्वासने देत आहेत. त्यातच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या महिलेने गाव तेथे बिअरबार सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
वनिता राऊत असे या महिला उमेदवाराचं नाव आहे. वनिता अखिल भारतीय मानवतावादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून दारूबंदी आहे. याचा फायदा या महिलेने आपल्या प्रचारात केला आहे. आपल्या पदयात्रेच्या वेळी वनिता राऊत यांनी मतदारांना म्हणाल्या की, गाव तिथे बिअर बार सुरू केला जाईल. मात्र दारू पिणाऱ्याकडे आणि विक्री करणाऱ्याकडे परवाना असायला हवा. कायदेशीर मार्गाने दारूविक्री केली जाईल. सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने मला निवडणूक लढवायला लागत आहे.
वनिता राऊत म्हणाल्या की, सरकार गोरगरीबांना समासुदीला आनंदाचा शिधा वाटते, रेशन कार्डवर साड्याही मिळतात. जर चंद्रपूरच्या जनतेने मला खासदार बनवलं तर आनंदाचा शिधासोबत व्हिस्की, बिअर जी काही उच्च दारू आहे. ती माझ्या खासदार निधीतून पुरवली जाईल. वनिता राऊत यांनी २०१९ मध्ये चिमूर मतदारसंघातून विधानसभा लढवली होती. त्यावेळी त्यांनी गाव तिथे बिअरबार सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र लोकांनी याला फार दाद दिली नाही.