Nana Patole slams Ashok Chavan : ‘काँग्रेसच्या जीवावर सर्व काही मिळवलं आणि भ्रष्टाचार केला, त्या अशोक चव्हाणांची स्वत:ची ओळख काय आहे? काँग्रेसवर बोलण्याची त्यांची लायकी नाही,’ अशा तिखट शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेलेले अशोक चव्हाण सध्या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात आहेत. आतापर्यंत काँग्रेसचं ऋण व्यक्त करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी प्रचाराच्या दरम्यान काँग्रेसवर टीका केली होती.
‘महाविकास आघाडीचं जागावाटप अजून झालेलं नाही. काँग्रेसला एकेकाळी राज्यात महत्त्व होतं, पण आता कुणी विचारत नाही. महाविकास आघाडीतील एक पक्ष काँग्रेसला न विचारताच आपले उमेदवार जाहीर करतो,’ असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी सणसणीत प्रतिक्रिया दिली.
‘काँग्रेसच्या जीवावर अशोक चव्हाण मोठे झाले. त्यांनी सर्व काही मिळवलं. भ्रष्टाचार केला आणि आता ते काँग्रेसबद्दल बोलतात. अशोक चव्हाणांची स्वत:ची ओळख काय आहे? त्यांच्या मतदारसंघात त्यांची हालत खराब आहे. एखादा माणूस स्वत:चेच कपडे फाडून घेतो तशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळं काँग्रेसवर बोलण्यापेक्षा तुम्ही आधी स्वत:कडं बघा. काँग्रेस हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारा पक्ष आहे. स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी बलिदान देणारा पक्ष आहे. त्यामुळं काँग्रेसवर बोलण्याची अशोक चव्हाणांची लायकी नाही,’ असं पटोले यांनी सुनावलं.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल अशोक चव्हाण यांनी टीका केली होती. त्याला पटोले यांनी उत्तर दिलं. ‘ज्यांच्यासोबत अशोक चव्हाण गेलेत, त्या महायुतीतही जागावाटपाचा वाद आहे. तिथं तर मोठा गोंधळ आहे. मुख्यमंत्री मध्येच गायब होतात. त्यांचे लोक त्यांच्या डोक्यावर बसतायत. त्यामुळं थोडं थाबा. आता रणधुमाळी सुरू झाली आहे. चार दिवस थांबा, मी त्यांच्या घरात जाऊन उत्तर देईन,’ असंही पटोले म्हणाले.
नाना पटोले हे भाजपशी संधान साधून आहेत. भंडारा-गोंदियातून लढण्याऐवजी त्यांना भाजपला वाट मोकळी करून दिली, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आता उत्तर देण्यास नाना पटोले यांनी नकार दिला. ते म्हणाले, ‘त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलू द्या. अंगावर आलंच आहे तर नानाचाही स्वभाव सडेतोड आहे. त्यांना योग्य, साजेसं आणि शोभेसं उत्तर, पुराव्यासह देऊ. खरं काय आहे ते लोकांनाही कळेल,’ असा सूचक इशारा पटोले यांनी दिला.