palghar lok sabha constituency: भाजपकडून आज १८ वी उमदवार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पालघर मतदारसंघातून दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पूत्र हेमंत विष्णू सावरा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप व शिंदे गटातपालघर मतदारसंघाचा जागावाटपाचा घोळ सुरू होता. अखेर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले आहे. या जागेवर शिंदे गटाचा विद्यमान खासदार आहे.
महायुतीच्या जागावाटपात पालघर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. त्यानंतर आज (२मे) भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली. पालघर मतदारसंघातून हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केल्याने विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
पालघरमधून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, बहुजन विकास आघाडीने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. यामुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून हेमंत सावरा, शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात मुकाबला होणार आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील राजेंद्र गावित हे येथील विद्यमान खासदार आहेत. यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पालघर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या ३ मे २०२४ ही आहे. अर्ज दाखल करण्याच्या केवळ एक दिवस आधी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील काही जागांचा पेच निर्माण झाला होता. त्यापैकी मुंबईतील सर्व जागांवर १ मे रोजी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात विशेष चर्चेत असलेले ठाणे आणि कल्याणची जागा शिंदेच्या शिवसेनेकडे गेली आहे. जवळपास सर्व जागांवरील तिढा सुटला होता. मात्र पालघरच्या जागेवर तोडगा निघाला नव्हता. या मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. अखेर ही जागा शिंदे गटाने सोडली. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला होता. राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
संबंधित बातम्या