Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या इथून निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामाही दिला आहे.
सरकारी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती स्वत: ज्योती मेटे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्योती मेटे उमेदवार असतील अशी सुरुवातीपासूनच चर्चा होती. शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी त्यांना सातत्यानं निवडणूक लढवण्यासाठी विनंती करत होते. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही ज्योती मेटे यांच्याशी चर्चा केली होती. त्या नेमका काय निर्णय घेतात याकडं लक्ष लागलं होतं. तो निर्णय अखेर झाला आहे.
ज्योती मेटे यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आणि कोणत्या पक्षातून लढणार याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केलेलं नाही. त्याबाबत त्या २९ मार्चला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपनं पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळं ज्योती मेटे यांच्यापुढं आता महाविकास आघाडी हा पर्याय आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडं (शरदचंद्र पवार) आहे. नुकतेच अजित पवार गटातून शरद पवारांकडं आलेले आमदार बजरंग सोनावणे हे देखील इथून इच्छुक असल्याचं समजतं. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यास शरद पवार काय निर्णय घेतात याकडं लक्ष लागलं आहे.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजकीय विजनवासात असलेल्या पंकजा मुंडे यांना पक्षानं बीड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सध्या या मतदारसंघात प्रीतम मुंडे खासदार आहेत. त्यांच्या जागी आता पंकजा यांना संधी देण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची संख्या मोठी आहे. मराठा आंदोलनामुळं तेथील जनमानस ढवळून निघालं आहे. विनायक मेटे यांची शिवसंग्राम ही संघटना मराठा समाजाचं काम करत असल्यामुळं मेटे यांना फायदा होऊ शकतो. अशा परिस्थिती पंकजा मुंडे यांना निवडून येण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत.
ज्योती मेटे यांच्यापुढं अपक्ष उमेदवारी करण्याचाही पर्याय आहे. सर्वच समाजाला आपलंसं करण्यासाठी त्या हा पर्याय जवळ करू शकतात. अशा वेळी महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार उभा करणार की ज्योती मेटे यांनाच पाठिंबा देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या