मुंबई (उत्तर-मध्य) लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून धारावीच्या आमदार, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच कॉंग्रेस पक्षांतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. मुंबई (उत्तर-मध्य) लोकसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार असलेले कॉंग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान यांनी प्रदेश कॉंग्रेसच्या प्रचार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या जागेसाठी नसीम खान यांनी दिल्लीत जाऊन जोरदार फिल्डिंग लावली होती. परंतु पक्षाने अखेरच्या क्षणी वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर केल्यामुळे नाराज नसिम खान यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात ४८ पैकी एकाही जागेवर अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे राज्यातील अनेक अल्पसंख्याक संघटना, कॉँग्रेस नेते, कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक समाजामध्ये नाराजगी असल्याचं सांगत लोकसभेच्या यापुढील टप्प्यात आपण कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात भाग घेऊ इच्छित नसल्याचं नसिम खान यांनी आज जाहीर केलं आहे.
तिकीट नाकारल्यामुळे नाराज नसीम खान यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या राज्याच्या प्रचार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या तिसरा, चौथा आणि पाचव्या टप्प्याचे स्टार प्रचारक म्हणूनही त्यांनी राजीनामा दिली आहे. अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटी व महाराष्ट्र कॉँग्रेस कमिटीकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. चालू लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने ४८ जागांपैकी एकही जागेवर अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने प्रचारादरम्यान अल्पसंख्याक समाजाकडून याची विचारणा होऊ शकते. प्रचारादरम्यान या प्रश्नाचे उत्तर देण्यास माझ्याकडे शब्द नसल्याने मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही, असं नसिम खान यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
कॉंग्रेस पक्षाने सन २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे एक किंवा दोन मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून कॉंग्रेस पक्षाकडून समाजातील प्रत्येक जाती आणि समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल अशी अपेक्षा होती, असं खान यांनी म्हटलं आहे.
मुंबई (उत्तर-मध्य) लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचं आपल्याला पक्षाकडून महिनाभरापूर्वी आश्वासन मिळालं होतं, असा दावा आरिफ नसिम खान यांनी या पत्रात म्हटलं आहे. आरिफ नसिम खान हे मुंबईतून सलग चार वेळा आमदार निवडून आले होते. २०१९ मध्ये चांदिवली मतदारसंघातून त्यांचा केवळ ४०९ मतांनी पराभव झाला होता. सध्या खान हे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत.