Varsha Gaikwad News: महाविकास आघाडीचं जागावाटप होऊनही अनेक दिवस रखडलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून अखेर काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना इथून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. ही खेळी खेळून काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर करतानाच मराठी व मुस्लिम मतांच्या बेरजेचं गणित सोडवल्याचं बोललं जात आहे.
महाविकास आघाडीमध्ये लोकसभेचं जागावाटप होऊन मुंबई उत्तर व मुंबई उत्तर मध्य हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. मात्र, काँग्रेसला दक्षिण मध्य मुंबईची जागा हवी होती. तिथं वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. मात्र, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडं गेली आणि तिथून ठाकरेंच्या शिवसेनेनं अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यावर काँग्रेसनं उत्तर मध्य मुंबई हा उतारा शोधला आहे.
उत्तर मध्य मुंबई हा दहा वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेसचा गड होता. इथून सुनील दत्त हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून जात होते. त्यानंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्ता इथून खासदार होत्या. २०१४ नंतर चित्र बदललं आणि पूनम महाजन या इथून खासदार झाल्या. राज्यातील सत्ता समीकरणं बदलल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. इथं माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, ती चर्चा हवेत विरली आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी मिळल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कांग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि खर्गे यांच्यासह कार्यकर्त्यांचे आभार मानले. ही निवडणूक भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी लढायची आहे. आम्ही एकजुटीने लढू आणि जिंकू, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षासोबतच वर्षा गायकवाड या एकनाथ गायकवाड यांच्या कन्याही आहेत. वर्षा गायकवाड या मुंबई आणि राज्यातील पक्षाचा दलित चेहरा आहेत. उद्धव ठाकरे सरकारमध्ये वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री होत्या. त्यांचे वडिल एकनाथ गायकवाड, तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. वर्षा गायकवाड २००४ पासून मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.