मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok sabha Election 2024 : पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला, १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

Lok sabha Election 2024 : पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला, १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 18, 2024 12:14 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८ ते १९या वयोगटातील१लाख ४१हजार ४५७नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

१.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क
१.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८ ते १९ या वयोगटातील १लाख ४१ हजार ४५७ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करुन घेतली आहे.

१८-१९ वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया या मतदारसंघात आहेत. रामटेक मतदारसंघात ३१,७२५, भंडारा-गोंदिया ३१,३५३, नागपूर २९,९१०, चंद्रपूर २४,४४३ आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात  २४,०२६ इतके नवमतदार आहेत. यासह २०-२९ वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात ३,८३,२७६,  भंडारा-गोंदिया ३,६६,५७०, चंद्रपूर ३,४२,७८७, नागपूर ३,३७,९६१ आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात ३,२८,७३५ इतके मतदार आहेत.

३०-३९ वयोगटातील सर्वाधिक मतदार हे नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात ५,०६,३७२, रामटेक ४,९०,३३९, चंद्रपूर ४,२५,८२९, भंडारा-गोंदिया ३,९९,११५ आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात ३,५६,९२१ इतके मतदार आहेत.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात ७०,६९८ इतके मतदार आहेत. त्यापाठोपाठ रामटेक ४६,४१३, भंडारा-गोंदिया ३८,२६९, चंद्रपुर ३७,४८० आणि गडचिरोली-चिमुर ३३,५५९ असे एकूण २,२६,४१९ ज्येष्ठ  मतदार आहेत. येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

महाराष्ट्राचा कल काय? ओपीनियन पोलमधून धक्कादायक निष्कर्ष, पाहा कुणाला किती जागा?

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर होत आहे. महाराष्ट्रात काय निकाल लागणार याची अनेकांना उत्सुकता लागली असून या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध झालेल्या अंतिम ओपिनियन पोलनुसार (opinion poll) गेल्या दोन महिन्यात राज्यात हवा पालटल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीला केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसत असून महायुती ३० जागांवर विजयी होणार असल्याचे सर्वेमधून दिसत आहे.

WhatsApp channel