
Shrikant Shinde Mahayuti Kalyan Candidate : कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजप आणि शिवसेनेने दावा केल्याने गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून कलगीतुरा रंगला होता. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांना मदत न करण्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी या मतदार संघातून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना तिकीट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून आता भाजप आमदार गणपत गायकवाड काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघातून श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. ही जागा भाजपला मिळावी अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली होती. मात्र, दरम्यान, शुक्रवारी कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेत जर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहिर झाल्यास प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असून श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा केली.
कल्याण येथून महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या बाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा केली. फडणवीस म्हणाले, श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध नाही. तेच कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणून राहणार आहेत. भाजप आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असून त्यांचा पूर्ण ताकदीने प्रचार करून त्यांना आम्ही निवडणून आणणार आहोत. त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल. महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष त्यांना निवडून आणू असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभा मतदार संघातून घोषणा केल्याने आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर दरेकर यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी एक राजकीय डाव टाकला आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तर वैशाली दरेकर या सामान्य कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे येथील लढत ही रंगतदार होणार आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केला होता. काल त्यांनी बैठक घेत श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेत ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघात भाजपचा उमेदवार उभा करावा अशी अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्याने ते काय भूमिका घेणार या कडे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या
