IPL 2024: विल जॅक्स (४१ चेंडूत १०० धावा) आणि विराट कोहलीच्या (४४ चेंडूत ८४ धावा) दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ९ विकेट्स राखून पराभव केला. साई सुदर्शन (४९ चेंडूत ८४ धावा) आणि शाहरुख खान (३० चेंडूत नाबाद ५८ धावा) यांच्या वादळी अर्धशतकाच्या मदतीने गुजरातने बंगळुरूसमोर २० षटकांत २०६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात बंगळुरूच्या संघाने अवघ्या १६व्या षटकातच सामना जिंकला.
नाणेफेक गमावून फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ विकेट्स गमावून २०० धावा केल्या. या आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करताना गुजरातची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.सलामीला फलंदाजीला आलेला रिद्धिमान साहा केवळ पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला स्वप्नील सिंहने त्याला आऊट केले. कर्णधार शुभमन गिल १६ धावा करुन माघारी परतला.ग्लेन मॅक्सवेलने त्याला आऊट केले.साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांच्यात तिसऱ्या विकेट्ससाठी ८६ धावांची भागीदारी झाली.मात्र, सिराजने शाहरुखला बाद करून त्यांच्या भागीदारीला पूर्णविराम लावला. सुदर्शनने मिलरसोबत चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची नाबाद भागीदारी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने १९ चेंडूत २६ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाची सुरुवात खराब झाली. साई सुदर्शनने बंगळुरुच्या डावातील चौथ्या षटकात ४० धावांच्या स्कोअरवर कर्णधार फाफ डुप्लेसिसला आऊट केले. या सामन्यात डू प्लेसिस २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर विल जॅक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. यानंतर विराट कोहली आणि विल जॅक शो सुरू झाला. दोघांनीही गुजरातच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. अखेर बंगळुरूने हा सामना १६ व्या षटाकातील अखरेच्या चेंडूवर ९ विकेट्स जिंकला. गुजरातकडून साई सुदर्शनला एकमेव विकेट मिळाली.
या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने खास पंक्तीत स्थान मिळवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना ५० किंवा त्यापेक्षा धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली (२४ अर्धशतक) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ३५ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर शिखर धवन (२३) तिसऱ्या क्रमांकावर, केएल राहुल चौथ्या आणि गौतम गंभीर पाचव्या क्रमांकावर आहे. ज्यांनी अनुक्रमे २२ आणि २१ अर्धशतक झळकावले आहेत.
संबंधित बातम्या