Gold Silver Rate Today : लग्नकार्यासाठी सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या सर्वसामान्यांची निराशा करणारी बातमी आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या भावानं नवा उच्चांक नोंदवला आहे. सोने तोळ्यामागे ६४,४०४ रुपये झालं आहे. इतकं महाग सोनं याआधी कधीच नव्हतं. चांदीनंही रंग दाखवला असून चांदीच्या दरात १२६१ रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई (Mumbai), दिल्ली, कोलकाता, गोरखपूर, लखनौ, जयपूर, इंदूर, जयपूर आणि पाटणा यासह सर्व शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोने थेट ९२४ रुपयांनी महागलं आहे. प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव ६४,४०४ रुपयांवर खुला झाला.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) च्या नवीन दरानुसार, आता सोन्यानं ४ डिसेंबर २०२३ च्या सर्वाधिक दराला मागे टाकलं आहे. या दिवशी सोन्याचा भाव ६३,८०५ रुपये प्रति दहा ग्रॅम होता.
आज ५ मार्च रोजी सराफा बाजारात २३ कॅरेट सोन्याची सरासरी किंमत ९२० रुपयांनी वाढून ६४,१४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव आता प्रति १० ग्रॅमला ८४६ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅमला ५८,९९४ रुपये झाला आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत ६९३ रुपये प्रति १० ग्रॅम वाढली आहे. आता १८ कॅरेट सोन्याचा भाव ४८,३०३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅमला ५४० रुपये इतकी वाढ झाली आहे. हे सोने आज ३७६७६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा भाव ७२०३८ रुपये प्रति किलो आहे. यात जीएसटी आणि घडणावळीच्या शुल्काचा समावेश नाही. त्यामुळं तुमच्या शहरात प्रत्यक्ष किंमत जास्त असू शकते.
मुंबईत आजचा सोन्याचा भाव २४ कॅरेटला ६४,८५० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव ५९,४५० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याचवेळी, चांदीचा आजचा भाव किलोमागे ७४,७०० रुपये इतका आहे.