मराठी बातम्या  /  बिझनेस  /  RBI bars IIFL : आयआयएफएल फायनान्सला आरबीआयचा दणका! गोल्ड लोन देण्यास बंदी

RBI bars IIFL : आयआयएफएल फायनान्सला आरबीआयचा दणका! गोल्ड लोन देण्यास बंदी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 04, 2024 07:41 PM IST

IIFL Finance Ban News : आयआयएफएल फायनान्सवर रिझर्व्ह बँकेनं (RBI) निर्बंधांचा बडगा उगारला आहे.

RBI bars IIFL : आयआयएफएल फायनान्सला आरबीआयचा दणका! गोल्ड लोन देण्यास बंदी
RBI bars IIFL : आयआयएफएल फायनान्सला आरबीआयचा दणका! गोल्ड लोन देण्यास बंदी (HT Photo)

IIFL Finance : रिझर्व्ह बँकेने (RBI) आयआयएफएल फायनान्सवर मोठी कारवाई केली आहे. गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये आढळलेल्या गंभीर त्रुटींची दखल घेत आरबीआयनं आयआयएफलच्या सुवर्ण कर्ज (Gold Loan) वितरणावर बंदी घातली आहे. मात्र, स्टँडर्ड कलेक्शन आणि रिकव्हरी प्रक्रियेचा वापर करून सध्याच्या पोर्टफोलिओचं व्यवस्थापन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

रिझर्व्ह बँकेनं या संदर्भात एक निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. आयआयएफएल फायनान्स लिमिटेडला गोल्ड लोन मंजूर करणे किंवा वितरित करणे किंवा कोणतेही सुवर्ण कर्ज देणे/सुरक्षित करणे किंवा विक्री करणे तात्काळ थांबवावी, असे निर्देश देण्यात आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. 

आयआयएफएल फायनान्सवर कठोर कारवाई का?

कंपनीच्या ३१ मार्चपर्यंत आर्थिक स्थितीची पाहणी केल्यानंतर कंपनीच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये महत्त्वपूर्ण त्रुटी दिसून आल्या आहेत.

> कर्ज मंजुरी आणि लिलावाच्या दरम्यान सोन्याची शुद्धता, निव्वळ वजन निश्चिती आणि प्रमाणीकरणात गंभीर त्रुटी.

> कर्ज-मूल्य गुणोत्तराचं उल्लंघन. 

> वैधानिक मर्यादेपेक्षा जास्त रोखीचं वितरण आणि संकलन. 

> प्रमाणित लिलाव प्रक्रियेचं उल्लंघन

> ग्राहकांच्या खात्यांवरील शुल्कात पारदर्शकतेचा अभाव

> नियमांचं उल्लंघन करून ग्राहकांच्या हितांशी तडजोड केल्याचं बँकेचं मत

आयआयएफएल फायनान्सचं पुढं काय?

गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांचा आयआयएफएल फायनान्सचं वरिष्ठ व्यवस्थापन आणि वैधानिक लेखापरीक्षकांशी सातत्यानं संवाद सुरू होता. गोल्ड लोन पोर्टफोलिओमधील त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यात अद्याप कोणतीही अर्थपूर्ण सुधारणा झालेली नाही. परिणामी, ग्राहकांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेने तात्काळ व्यावसायिक निर्बंध लागू करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.

रिझर्व्ह बँकेनं आयआयएफएल फायनान्सचं विशेष लेखापरीक्षण सुरू केलं आहे. हे लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यात आढळलेल्या त्रुटी कंपनीनं दूर केल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधांचा आढावा घेतला जाईल, असं आरबीआयनं म्हटलं आहे.

WhatsApp channel

विभाग