Tata Motors Split News : टाटा समूहातील दिग्गज आणि सर्वाधिक चर्चेतील कंपनी असलेल्या टाटा मोटर्सशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. टाटा मोटर्स या महाकाय कंपनीचं दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं (TML Board) आज या संदर्भातील प्रस्तावास मंजुरी दिली.
टाटा मोटर्स या एका कंपनीत सध्या सर्व प्रकारच्या वाहनांची निर्मिती होते. आता व्यावसायिक वाहन (Commercial Vehicle) व प्रवासी वाहन (Passenger Vehicle) निर्मितीसाठी दोन स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्यात येणार आहेत. डीमर्जरनंतर एक कंपनी कमर्शियल व्हेइकल व त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करेल. तर दुसरी कंपनी इलेक्ट्रिक व्हेइकल्स, जॅग्वार, लँड रोव्हर व त्याच्याशी संबंधित व्यवसाय पाहील. या संपूर्ण प्रक्रियेला १२ ते १५ महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती कंपनीनं एका निवेदनाद्वारे दिली आहे.
टाटा मोटर्सच्या विभाजनानंतर आकारास येणाऱ्या दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात येणार आहेत. टाटा मोटर्सच्या सध्याच्या सर्व शेअरहोल्डर्सना नव्या आकारास येणाऱ्या दोन्ही कंपन्यांमध्ये समान शेअर्स मिळतील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. याचाच अर्थ, ज्या गुंतवणूकदारांकडं आता टाटा मोटर्सचे शेअर आहेत. त्यांना नव्या दोन्ही कंपन्यांत तितकेच शेअर मिळणार आहेत.
कंपनीचे तीन ऑटोमोटिव्ह बिझनेस युनिट्स सध्या स्वतंत्रपणे कार्यरत आहेत आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. कंपनीच्या विभाजनामुळं तीन युनिट्सना अधिक लक्ष केंद्रित करता येईल आणि वेगानं प्रगती करता येईल, असा विश्वास टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला. ग्राहक आणि गुंतवणूकदारांवर विभाजनाचा कुठलाही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट ग्राहकांना अधिक दर्जेदार उत्पादनांचा अनुभव घेता येईल. आमच्या कर्मचाऱ्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. तसंच, शेअर होल्डर्सनाही आर्थिक फायदा होईल, असे चंद्रशेखरन म्हणाले.
मागील वर्षभरात टाटा मोटर्सनं शेअर बाजारात चांगली कामगिरी केली आहे. मागच्या एका वर्षात कंपनीनं गुंतवणूकदारांना तब्बल १२५ टक्के परतावा दिला आहे. ६ मार्च २०२३ रोजी कंपनीचे शेअर ४३९.९५ रुपयांवर होते, आज ते एनएसईवर ९८८.९० रुपयांवर पोहोचले आहेत.