उद्या ईशानही म्हणेल मी रांचीचा आहे, मला घ्या, असं होत नाही… 'त्या' प्रश्नावर रोहित शर्मा भडकला!
Rohit Sharma on Rajat Patidar : रजत पाटीदारला इंदूरच्या सामन्यात का खेळवलं गेलं नाही, या प्रश्नावर रोहित शर्मा चांगलाच भडकला.
Rohit Sharma on Rajat Patidar : न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा एका प्रश्नावर चांगलाच संतापला. रजत पाटीदार याला शेवटच्या सामन्यात संधी का दिली गेली नाही, असा तो प्रश्न होता. त्या प्रश्नावर रोहित भडकलेला दिसला.
ट्रेंडिंग न्यूज
न्यूझीलंड विरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारताच्या अंतिम १५ मध्ये स्थान मिळालेल्या रजत पाटीदार याचंं ते होमग्राउंड आहे. भारतीय संघानं मालिकेत २-० अशी आघाडी घेतल्यामुळं तिसऱ्या वनडेसाठी रजतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल असं मानलं जात होतं. मात्र, तसं झालं नाही.
पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माला हाच प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यानं सविस्तर उत्तर दिलं. 'उद्या ईशान किशन म्हणेल मी रांचीचा आहे, तिथं खेळताना मला संधी द्या. असं होत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक खेळाडूला निश्चितच संधी दिली जाईल, असं तो म्हणाला.
'जागा असेल तर खेळवता येईल ना! आता जे कोणी खेळतायत, त्यांच्यावर नजर टाका. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, इशान किशन चौथ्या क्रमांकावर आहे. द्विशतक करूनही मागच्या मालिकेत त्याला बाहेर बसावं लागलं होतं. पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. सूर्यकुमार ही काय चीज आहे आणि तो कसा खेळतोय हे जगाला माहीत आहे. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आहे. जागा तरी असायला पाहिजे. आम्हाला सगळ्यांनाच संधी द्यायची आहे. पण जागा रिकामी होईपर्यंत आमचाही नाईलाज आहे, असं रोहित म्हणाला.
'इंदूरमध्ये रजतला खेळायला द्यायला हवं होतं हे मलाही समजतं, पण उद्या इशान म्हणेल झारखंड आणि रांचीमध्ये मला संधी द्या. मी तिथला आहे. पण तसं होत नाही. काही योजना आधीच ठरलेल्या असतात. अनेक मुलं रांगेत आहेत. सर्वांना संधी मिळेल असं आम्ही आश्वस्त केलंय, असंही त्यानं सांगितलं.
इंदूरच्या सामन्यात टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं ही मजल मारली होती. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २९५ धावांवर गडगडला. शार्दुल ठाकूरला सामनावीर आणि शुभमन गिलला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं.