Dhamtari Chhattisgarh Crime News Marathi : लग्नाची पूर्ण तयारी झालेली असतानाच लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणानं छताच्या पंख्याला गळफास लावून स्वत:ला संपवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातल्या डोडकी गावात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रोशन बांधे असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यानंतर आता २४ तासांनंतर पार पडणारा लग्नसोहळा रद्द झाला आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील डोडकी या गावात राहणाऱ्या रोशन बांधे या तरुणाचं परिसरातील एका तरुणीशी लग्न ठरलं होतं. दोन्हीकडच्या मंडळींनी लग्नाची तारीखही निश्चित केली. एवढंच नाही तर लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. परंतु लग्नाच्या आधल्या दिवशी रोशनच्या घरी तिच्या बहिणींसह इतर नातेवाईकांनी गर्दी केली. लग्नासंदर्भातील पारंपारिक विधी पार पडल्यानंतर सर्वजण झोपण्यास निधून गेले. त्याचवेळी रोशनने घरातील पंख्याला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. त्यानंतर सकाळी कुटुंबातील लोकांनी रोशनच्या रुमचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून कोणताच आवाज न आल्यामुळं लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करताच त्यांना रोशनने आत्महत्या केल्याचं समजलं.
रोशने आत्महत्या केल्याचं समजताच त्याच्या कुटुंबियांसह पाहुण्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. रोशनचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास केला जात असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.