Girish Bapat : पुण्यात आले पण विदर्भाशी नातं कायम ठेवलं; गिरीश बापटांचा हा किस्सा माहितीय का?
Girish Bapat Passed Away : गिरीश बापट हे यांचं कार्यक्षेत्र पुणे असलं तरी ते अनेकदा विदर्भात यायचे. इतकंच नाही तर अमरावतीत त्यांची शेती देखील आहे.
BJP MP Girish Bapat Passed Away : भाजपाचे जेष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु दुपारी त्यांना अखेरचा श्वास घेतला. त्यामुळं आता पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गिरीश बापटांच्या निधनामुळं शोक व्यक्त केला जात आहे. परंतु गिरीश बापट गेल्या अनेक दशकांपासून पुण्यात कार्यरत असले तरी त्यांचं मूळ गाव हे अमरावतीच्या चांदूर तालुक्यातील मग्रापूर हे होतं. पुण्याच्या राजकारणात गिरीश बापटांनी वेगळा ठसा उमटवला असला तरी त्यांनी अमरावती जिल्ह्याशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही.
ट्रेंडिंग न्यूज
गिरीश बापट यांची मूळ गावी म्हणजेच अमरावतीच्या मग्रापूर येथे ३० एकर शेतजमीन आहे. त्यांनी अनेकदा पुण्यातून मग्रापुरमध्ये येत शेती केली होती. गिरीश बापट यांचे दोन्ही मामा अमरावतीत राहतात. गावाची ओढ असल्यामुळं गिरीश बापट अनेकदा मग्रापुरला यायचे. गिरीश बापट यांचे वडील भालचंद्र बापट हे कँटोन्मेंट बोर्डात नोकरीला होते. त्यांची पुण्यात बदली झाल्यानंतर बापट कुटुंब पुण्यात स्थायिक झालं होतं. गिरीश बापट हे पुणे मनपात नगरसेवक, कसब्यातून आमदार आणि पुण्याचे खासदार झाल्यानंतरही त्यांनी मूळ गावी जाणं कधीही थांबवलं नव्हतं. त्यामुळं अमरावती जिल्ह्यातील अनेक सामान्य लोक त्यांना सहज ओळखून विचारपूस करायचे.
गिरीश बापट यांनी अमरावतीच्या मग्रापूर येथे शेती करण्याबरोबरच २०१७ साली भलीमोठी गोशाळा आणि गोवंश संशोधन केंद्राची स्थापना केली होती. या संशोधन केंद्राचं क्षेत्र तब्बल ४२ एकरावर पसरलेलं आहे. भाकड गायींची निगा राखणं आणि देशी गायींच्या संगोपनाचं काम या संशोधन केंद्रामार्फत केलं जातं.