BJP MP Girish Bapat Passed Away : भाजपाचे जेष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बापट आजारी होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. गिरीश बापटांच्या निधनामुळं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापटांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा कष्टाळू नेता हरपल्याची भावना पीएम मोदींनी व्यक्त केली आहे.
पीएम मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, खासदार गिरीश बापट हे अत्यंत नम्र स्वभावाचे आणि कष्टाळू नेते होते. अत्यंत तळमळीनं आणि आपलेपणाच्या भावनेनं त्यांनी समाजाची सेवा केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांचं निधन ही अत्यंत दुःखद घटना असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीश बापट यांच्यासोबतचा एक फोटोही शेयर केला आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील दिसत आहेत.
गिरीश बापटांनी महाराष्ट्रात भाजपाच्या उभारणीसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली. सातत्यानं लोकांचे प्रश्न मांडणारे प्रभावी नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत होता. आमदार किंवा खासदार असताना त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं. लोकसभेतली त्यांची कारकिर्द अत्यंत चांगली आणि प्रभावी राहिली होती. आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवत त्यांनी अनेकांना प्रेरणा देण्याचं काम केल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.