Wayanad Lok Sabha By-Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून सूरतमधील कोर्टानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळं आता केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता वायनाडमध्येही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाकडून आज कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, विधानसभा अथवा लोकसभेच्या जागा रिक्त झाल्या असतील तर तिथं पोटनिवडणूक घेण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असतो. कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे, परंतु पुढील सुनावणीसाठी न्यायालयानं त्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळं वायनाडमध्ये पोटनिवडणूक घेण्याची आम्हाला कोणतीही घाई नाहीये, असं म्हणत राजीव कुमार यांनी पोटनिवडणूक लगेच जाहीर होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. तर वायनाडमध्ये राहुल गांधी विक्रमी मतांनी निवडून आले होते. त्यानंतर आता राहुल गांधींना कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर वायनाडमध्ये तुर्तास तरी पोटनिवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.