Slogans for arvind kejriwal during ipl match : : अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविन्द केजरिवाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल झिंदाबाद, 'दिल्ली जीतेंगे, केजरीवाल जीतेंगे', 'जेल का जवाब, वोट से' अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांचा घोषणाबाजी करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू असलेला सामना पाहण्यासाठी आलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे टी-शर्ट घातले होते. या टी शर्टवर 'जेल का जवाब वोट से' असा मजकूर लिहिला होता. या सामन्या दरम्यान त्यांनी अरविन्द केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या. 'दिल्ली जीतेंगे, केजरीवाल जीतेंगे' या घोषणा देतानाचा त्यांचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
अरविंद केजरीवाल यांना या वर्षी २१ मार्च रोजी दिल्ली मद्य धोरणा प्रकरणी व उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अरविन्द केजरीवाळ सध्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी केजरीवाल यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यात काहीही बेकायदेशीर नसल्याचे कोर्टाने म्हटले होते. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने ईडीकडे त्यांना अटक करण्याशिवाय पर्याय नव्हता असे देखील कोर्टाने म्हटले होते. हे प्रकरण २०२१-२२ साठी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. हे धोरण नंतर रद्द करण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीना बाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्याबाबत कोणताही आदेश दिला नाही. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान अंतरिम जामीन मंजूर करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. दुपारी दोन वाजता निकाल सुनावणार असल्याचेही खंडपीठाने सांगितले होते, मात्र निकाल जाहीर करण्यात आला नाही. ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एस व्ही राजू यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला.