Mumbai somaiya school : पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्टला लाइक करणे आणि त्यावर कमेन्ट करणे मुंबईतील सोमय्या स्कूलच्या मुख्याध्यापिकेला भोवले आहे. शाळा प्रशासनाने त्यांची हकालपट्टी केली आहे. परवीन शेख असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. त्यांनी पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या व समर्थनार्थ पोस्ट लाइक करून त्यावर त्यांच मत मांडले होते. शाळा प्रशासनाने मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई केली.
इस्रायल हमास युद्ध सुरू होऊन काही महीने झाले आहे. यात अनेक पॅलेस्टाईन आणि हमास यांच्या बाबत सहानुभूति दर्शवणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडीयावर प्रसारित होत असताना सोमय्या स्कूलच्या मुख्याध्यापिका परविन शेख यांनी या प्रकारच्या मजकुराला लाइक करून त्यावर त्यांचे मत मांडणारी कमेन्ट पोस्ट केली होती. या पोस्ट वरून सोमय्या स्कूलने त्यांना नोटिस बजावत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
परवीन शेख यांनी २४ एप्रिल रोजी याबाबत पोस्ट केली होती. या बाबत एका वेबसाइटवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर शाळा प्रशासनाने शेख यांची चौकशी सुरू केली होती. त्यासाठी २६ एप्रिल रोजी बैठक देखील घेण्यात आली होती. परवीन यांना या बैठकीनंतर शाळा प्रशासनाने राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, परवीन यांनी राजीनामा न देता काम सुरूच ठेवले होते. यामुळे परवीन यांना लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. शेख यांनी ६ मे रोजी लेखी खुलासा दिला तसेच राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या. त्यांचा लेखी खुलासा आणि चौकशीनंतर सोमय्या शाळेच्या प्रशासनाने त्यांना कामावरून काढून टाकले. तसा मेल शेख यांना पाठवण्यात आला आहे.
या बाबत शाळा प्रशासनाने म्हटले आहे की, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे समर्थन करत असून मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलेली भूमिका ही ‘सोमय्या व्यवस्थापन’ जपत असलेल्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत असून यामुळे परवीन शेख यांना नोकरीवरून काढण्यात आले असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे. ‘ज्ञानदेव तू कैवल्यम्’ हे आमचे ब्रिदवाक्य असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समजूतदारपणा वाढविणे आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. परवीन शेख यांनी सोशल मिडियावर केलेली पोस्ट ही आमच्या मूल्यांशी विसंगत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मला मुख्याध्यापिका पदावरून व नोकरीवरून काढल्याने धक्का बसला आहे. मला दिलेली नोटीस ही बेकायदेशीर असून माझ्यावर करण्यात आलेली कारवाई ही खोट्या आरोपांवर आधारित आहे. मुख्याध्यापिका म्हणून मी केलेले काम हे उत्तम असूंन अशा पद्धतीने पदावरून हटविणे हे अन्यायकारक आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असूंन या बाबत कायदेशीर लढा देणार आहे.