supreme court rejects baba ramdev apology : पतंजली आयुर्वेदने कोरोनावरील औषध कोरोनीलबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचा दूसरा माफीनामा देखील न्यायालयाने फेटाळला असून दोघांनाही पुन्हा कोर्टाने झापले आहे. आम्ही आंधळे नाहीत, आम्ही सर्व गोष्टी पाहतो आणि समजून देखील घेतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. बाबा रामदेव आणि पतंजली यांच्याकडून माफी मागणारे दुसरे प्रतिज्ञापत्र न्यायालयाने फेटाळले तसेच तुम्ही अवमानाच्या कारवाईसाठी तयार राहा, असे देखील कोर्टाने दोघांनाही सांगितले आहे.
बाबा रामदेव आणि पतंजली यांच्याकडून माफी मागणारे दुसरे प्रतिज्ञापत्राशी सहमत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच हा माफीनामा फेटाळत असल्याचे देखील कोर्टाने म्हटले आहे. त्यावर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाबा रामदेव आणि पतंजली यांची बाजू मांडताना सांगितले की, आम्हाला १० दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर पुढच्या सुनावणीत आम्ही माहिती देऊ. या प्रकरणी योगगुरू रामदेव यांनी यापूर्वी माफी मागितली होती तसेच या जाहिरातींवर बंदी घालणार असल्याचं देखील कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतरही या जाहिराती सुरूच राहिल्या, त्यावर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. माफी कागदावरच मागीतली असतांनाही तुम्ही गोष्टी चालू ठेवल्या. आम्ही आता तुमची माफी नाकारतो आणि पुढील कारवाईसाठी तयार राहा, असे कोर्टाने म्हटले आहे.
इतकेच नाही तर खंडपीठात समाविष्ट असलेले न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, आम्ही आंधळे नाहीत. यावर पतंजलीचा बचाव करताना वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, लोक चुका करतात. या युक्तिवादाला उत्तर देताना खंडपीठाने म्हटले की, जर लोकांनी चुका केल्या तर त्याचे परिणाम त्यांनाही भोगावे लागतात. या प्रकरणात आम्ही फारशी उदासीनता दाखवणार नाही.
न्यायालयाचे कामकाज सुरू होताच मुकुल रोहतगी यांनी बाबा रामदेव यांचे वक्तव्य वाचून दाखवत कोणत्याही अटीशिवाय माफी मागत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती कोहली यांनीही केंद्र सरकारवर ताशेरे ओढत तुम्ही हे प्रकरण जाणूनबुजून झाकोळले असल्याचे म्हटले आहे. सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी असतांना सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काहीही केले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
केंद्र सरकारनेही आज या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सरकारने सांगितले की आम्ही पतंजली आयुर्वेदला या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल आधीच चेतावणी दिली होती आणि जोपर्यंत कोरोनिलची चौकशी आयुष मंत्रालयाकडून होत नाही तोपर्यंत या संबंधी जाहिराती करण्यास मनाई केली होती. एवढेच नाही तर आम्ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या प्रकरणी कारवाई करण्यास सांगितले असल्याचे सरकारने बाजू मांडतांना म्हटले आहे.
संबंधित बातम्या