देशात तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण देणाऱ्या Indian Institute of Technology अर्थात आयआयटीमध्ये गेल्या २० वर्षात तब्बल ११५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल आयआयटी अॅल्युमिनी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंह यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नातून ही माहिती मिळाली आहे. यातील ९८ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना या आयआयटी महाविद्यालय परिसरात घडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. ९८ पैकी ५६ मृत्यू हे गळफास घेऊन झाले आहे. तर १७ जणांनी महाविद्यालय परिसराबाहेर आत्महत्या केल्याची माहिती आहे.
२००५ ते २०२४ या कालावधीत आयआयटी, मद्रासमध्ये सर्वाधिक २६ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहे. तर आयआयटी कानपूरमध्ये १८, आयआयटी खरगपूरमध्ये १३ आणि आयआयटी मुंबईमध्ये १० जणांनी आत्महत्या केली आहे. चालू वर्षात आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे.
१२ फेब्रुवारी २०२३ रोजी आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर धीरज सिंह यांनी उच्च शिक्षण विभागाकडे माहितीच्या अधिकारातून अर्ज दाखल करून गेल्या २० वर्षांत देशभरातील आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची आकडेवारी मागितली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने सुरुवातीला धीरज सिंह यांचा अर्ज फेटाळून लावला होता. प्रत्येक संस्थेसाठी स्वतंत्र आरटीआय अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. या आवाहनानंतर मंत्रालयाने सर्व आयआयटींना डेटा शेअर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, गेल्या आठ महिन्यांत देशभरातील २३ पैकी केवळ १३ आयआयटी संस्थांनी सिंग यांना माहिती दिली होती. तसेच सिंह यांनी यासंवंधी सार्वजनिकपणे उपलब्ध असलेली सरकारी आकडेवारी गोळा केली आहे. यात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीचा समावेश आहे. शिवाय संसदेत यासंबंधी वेळोवेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची देण्यात आलेली उत्तरे या समाविष्ट करण्यात आलेली आहे.
मुंंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या मृत्यूनंतर आयआयटीच्या विविध विद्यार्थी संघटनांनी अंतर्गत सर्वेक्षण केले होते. यात ६१ टक्के लोकांनी विद्यार्थ्यांचा मृत्यू शैक्षणिक तणावामुळे झाल्याचे मत व्यक्त केले होते. त्याखालोखाल नोकरीतील असुरक्षितता (१२ टक्के), कौटुंबिक समस्या (१० टक्के) आणि कॅम्पसमध्ये होणारा छळ (६ टक्के) ही कारणे पुढे आली होती. अकरा टक्के विद्यार्थ्यांनी 'इतर कारणे' या कॉलमवर टिक मारली.
दर्शन सोलंकीच्या मृत्यूनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध पावले उचलली आणि उच्च शिक्षण संस्थांना शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, कल्याण आणि मानसिक आणि भावनिक कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी सूचना जारी केल्या होत्या. कोविड-19 च्या साथीच्या काळात विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबियांना मानसिक आणि भावनिक आधार देण्यासाठी मनोदर्पण नावाचा एक सरकारी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सोळंकी याच्या आत्महत्येनंतर गेल्या वर्षी झालेल्या आयआयटी मुंबईच्या सिनेटमध्ये आयआयटी मुंबईने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक विषय वगळला होता. फ्रेशर्सवरील ताण कमी करणे आणि कॅम्पस लाइफशी जुळवून घेण्याचा यामागचा हेतु असल्याचे आयआयटी-मुंबईच्या अधिकाऱ्याने सांगितले.